पुणे : केंद्राच्या निर्णयानुसार महापालिकेने आज, शुक्रवारपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील ६८ दवाखान्यांमध्ये कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड दोन्ही लसींचे डोस उपलब्ध असतील. येथे शहरातील १८ ते ५९ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस मोफत दिला जाणार आहे.
ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिने किंवा २६ आठवडे पूर्ण झाले आहेत, अशा नागरिकांसह मागील तीन महिन्यांत कोरोनाचा संसर्ग न झालेले नागरिक प्रतिबंधात्मक डोससाठी पात्र राहणार आहेत. पात्र नागरिकांनी घराजवळील महापालिकेच्या दवाखाना अथवा रुग्णालयात जाऊन मोफत लस घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.
नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करून किंवा प्रत्यक्ष केंद्रावर येऊन नोंदणी करूनही लस घेता येईल. निश्चित कोट्यानुसार या लसींचे डोस उपलब्ध होतील. ऑनलाइन बुकिंगसाठीचे स्लॉट्स सकाळी आठ वाजता खुले होतील, अशी माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.