राज्यात व शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून प्रतिबंधक उपाय म्हणून कोरोनाचा विरोधातील लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांना शहरातील केंद्रांवर रांगा लावून उभे रहावे लागत आहे. तसेच काही ठिकाणी लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच लस घेण्यासाठी विद्यापीठाबाहेर गेल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.
विद्यापीठाने एका केंद्रावर लसीकरणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती. त्याचा लाभ काही कर्मचारी व अधिका-यांनी घेतला आहे. आता उर्वरित सेवकांना विद्यापीठ आवारातच लस दिली जाणार आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने याबाबत विद्यापीठाकडे असणा-या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे लवकरच विद्यापीठाच्या सेवकांना व ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणा-या त्यांच्या कुटुंबीयांना घराजवळ लस घेता येईल, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.