पुणे : कोरोना काळात प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या चुकांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या ‘ओव्हर स्मार्ट’ कारभारामुळे शेकडो नागरिकांचे चाचणी अहवाल बदलले गेले. पॉझिटीव्ह रुग्णांची नावे निगेटीव्ह यादीमध्ये तर निगेटीव्ह रुग्णांची नावे पॉझिटीव्ह यादीमध्ये टाकली गेल्याने एकच गोंधळ उडाला. नागरिकांकडे निगेटीव्ह आणि पालिकेकडे त्याच व्यक्तीचे नाव पॉझिटीव्ह अशा विरोधाभासामुळे यंत्रणेचा पुरता फज्जा उडाला. पालिकेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी घशातील द्रावाची चाचणी तसेच अॅन्टीजेन चाचणी केल्यानंतर त्यांचे अहवाल प्राप्त होतात. हे अहवाल पुर्वी डॉ. नायडू रुग्णालयामध्ये एकत्रित डाटा एन्ट्री केले जात होते. आता हे काम स्मार्ट सिटीमध्ये केले जाते. नागरिकांनी केलेल्या चाचणीचे अहवाल नागरिकांनाही देण्यात येतात. दोन दिवसांपुर्वी आलेल्या चाचण्यांचे अहवाल स्मार्टसिटीला प्राप्त झाले. जवळपास 250 ते 300 नागरिकांचे अहवाल निगेटीव्ह असताना त्यांची नावे पॉझिटीव्ह यादीमध्ये टाकण्यात आली. ‘फॉर्म डी’ मध्ये कॉपी पेस्ट करताना निगेटीव्ह असलेल्या नागरिकांची नावे पॉझिटीव्ह रुग्णांच्या यादीमध्ये पेस्ट झाली. त्यानंतर ही यादी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे देण्यात आली. आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांनी या यादीनुसार नागरिकांना फोन केले. तसेच या रुग्णांना कोविड सेंटर्समध्ये आणण्याकरिता पथकेही पाठविण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील आरोग्य विभागाची पथके नागरिकांच्या घरी गेल्यानंतर नागरिकांनी आपण निगेटीव्ह असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. परंतू, पालिकेच्या कर्मचा-यांकडील यादीमध्ये ते नागरिका पॉझिटीव्ह दर्शविण्यात आलेले होते. तर, नागरिकांनी त्यांच्याकडील अहवालामध्ये निगेटीव्ह नमूद असल्याचे दाखविण्यास सुरुवात केली. बिबवेवाडी, विश्रामबागवाडा, नगररस्ता, येरवडा आदी क्षेत्रीय कार्यालयांमधील यादीमध्ये हा घोळ झाल्याचे समोर आले. यासंदर्भात स्मार्टसिटीकडे चौकशी केल्यानंतर हा गोंधळ चुकीच्या ‘कॉपी पेस्ट’मुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर, ही सर्व पथके परत बोलावण्यात आली. तसेच नागरिकांना ते ‘निगेटीव्ह’च असल्याचे सांगण्यात आले. ==== पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये काम करणा-या लेखनिकालाही असाच अनुभव आला. या लेखनिकाची कोरोना चाचणी निगेटीव्ह आलेली होती. परंतू, स्मार्ट सिटीकडून पालिकेला देण्यात आलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या यादीत त्याचे नाव होते. त्यांच्याकडील निगेटीव्ह अहवाल पाहिल्यावर या यादीमध्येच गडबड असल्याचे समोर आले. ====ससून आणि एनआयव्हीमधील तपासणी बंदनागरिकांच्या स्वाब तसेच अॅन्टीजेन कीटद्वारे घेतलेल्या नमुन्यांची तपासणी ससून आणि एनआयव्हीच्या प्रयोगशाळेत केली जाते. परंतू, मागील दोन दिवसांपासून येथील तपासणी बंद करण्यात आली होती. दोन दिवसांपासून हे नमुने स्विकारणे बंद करण्यात आले होते. ससून आणि एनआयव्हीच्या प्रयोगशाळांमधील कर्मचारी कोरोना बाधित झाल्याने हे नमुने घेणे बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. त्यामुळे पालिकेने आयसरसह शासकीय लॅबमध्ये हे नमुने तपासणीसाठी पाठविले होते.
शेकडो नागरिकांचे कोरोना अहवाल बदलले ; स्मार्ट सिटीच्या ‘ओव्हर स्मार्ट’ कारभाराचा नमुना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 12:37 PM