आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंचर शहर शांतता समिती तसेच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शरद पवार सभागृहात झाली. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपसरपंच युवराज बाणखेले,शरद बँकेचे संचालक दत्ता थोरात,अल्लू इनामदार,राजू इनामदार, कल्पेश आप्पा बाणखेले, संदीप बाणखेले, लक्ष्मण थोरात, राजाबाबू थोरात, अण्णा निघोट आदी उपस्थित होते.
अनिल लंभाते म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नियमांचे काटेकोर पालन करावे. उत्सव साजरे करताना दुसऱ्यांना त्रास होईल, रुग्णवाहिका व इतर वाहनांना जाण्यासाठी अडथळा होईल अशा प्रकारे गणेश मंडळाने मंडप उभारून नये. गणेश विसर्जन व आगमनाची मिरवणूक होणार नाही. पोलीस ठाण्याच्या माध्यमातून गावोगाव बैठक घेऊन प्रबोधन केले जाणार आहे. विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना बक्षीस दिले जाईल. गणेश मंडळांनी विजेचे अधिकृत कनेक्शन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले यांनी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासारखे विधायक उपक्रम राबवणाऱ्या गणेश मंडळांना बक्षीस देण्याची सूचना केली. माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर शहरात शांततेत गणेशोत्सव पार पडेल अशी ग्वाही दिली. सरपंच किरण राजगुरू यांनी कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा अशी सूचना केली. भाजपचे नवनाथ थोरात,संध्या बाणखेले, पोलीस उपनिरीक्षक लहू थाटे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्ता थोरात, सूत्रसंचालन राजेश नलवडे तर आभार राजू इनामदार यांनी केले.
०३ मंचर
मंचर शहर शांतता समितीच्या बैठकीत बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते.