पुणे : वन्यप्राण्यांचे जतन आणि संवर्धन याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. हौस म्हणून आपण काय काय खाणार आहोत? कोरोना व्हायरस कोणत्या प्राण्यातून आला आहे, हे अजून कळलेले नाही. जगाचा नाश करायला एक विषाणू पुरेसा आहे. कोरोनाने जगाला मोठा धडा शिकवला. आता तरी आपण जागे होणार आहोत का, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी उपस्थित केला. निसर्गाचा समतोल न साधल्यास आॅस्ट्रेलियातील जंगल जळण्यासारखे प्रकार घडायला वेळ लागणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. राजहंस प्रकाशनातर्फे टेरी इरविन यांनी लिहिलेल्या आणि सोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित ‘स्टीव्ह आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी ‘पानिपत’कार विश्वास पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून आरती गोगटे उपस्थित होत्या.>समतोल बिघडलाआमटे म्हणाले, ‘आपणच निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. त्यामुळे मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे, हे आपल्याला अजून समजलेले नाही. मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी सगळ्यांशीच माझा जवळून संबंध आला. यापैकी कोण सर्वात चांगले, असे मला विचारल्यास मी एकही क्षण न दवडता, वन्यप्राणी हेच उत्तर देईन. कारण प्राण्यांकडून मिळणारे प्रेम, विश्वास अद्भुत आहे.