पुण्यातील अनेकांना हा अनुभव आला असेल. प्रशासन किंवा रुग्णालयांवर दोषारोप करण्याचा हेतू नसला तरी सामान्य माणूस काय भोगतोय याबाबत गांभीर्याने विचार करून नागरिकांना माहिती देण्यासाठी व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे.
प्रवास कोरोना चाचणी ते रुग्णालयांपर्यंतचा...एका मुलाचा अनुभव
८ एप्रिल : संध्याकाळी वडिलांना अचानक चक्कर आली. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. त्यांनी पल्स आणि बीपी चेक केल्यावर कोरोनाची तपासणी करायला सांगितली. तोपर्यंत वडिलांना खूपच अशक्तपणा जाणवायला लागला होता.
१० एप्रिल : शनिवारचा दिवस होता. मी सकाळपासूनच लॅबमध्ये नंबर लावून ठेवला. पण ते आल्यावर म्हणाले, आम्ही घरी येऊन चेक करू शकणार नाही. आमच्याकडे चेक करायचे किट संपले आहेत. फक्त ४ किट आहेत. ते संपवून लॅब बंद करणार आहोत. खूप विनवणी केल्यावर त्यांनी माझ्या आई-वडिलासाठी २ किट बाजूला काढून ठेवले. मी क्षणाचाही विलंब न करता घरी जाऊन आई आणि वडिलांना तेथे घेऊन आलो आणि त्यांची टेस्ट करून घेतली. शनिवारी केलेल्या तपासणीचा रिपोर्ट सोमवारी मिळणार होता. त्यामुळे मी दोघांना घेऊन घरी आलो.
११ एप्रिल : घरी आल्यावर वडिलांना जाणवणारा अशक्तपणा हळूहळू वाढतच होता. सोमवारची वाट बघता कसाबसा रविवार गेला. लॅबने दिलेल्या नंबरवर एकसारखे फोन करत होतो; परंतु कोणीही फोन उचलत नव्हते.
१२-१३ एप्रिल: सोमवार गेला. मंगळवारही असाच गेला. इकडे वडिलांची तब्येत खराब होत होती.
१४ एप्रिल : बुधवारी सकाळी लॅबच्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो. पण तरीही रिपोर्ट आला नव्हता. पूर्ण २ तास तिथे बसूनच वाट बघितली. शेवटी तेथील कर्मचाऱ्याला माझी दया आली. ते म्हणाले, तुम्ही जा. मी रिपोर्ट आला की मोबाईलवर पाठवते. आश्वासन घेऊन मी निघालो. परंतु तरीही मनात तीच गुंतागुंत होती की, रिपोर्ट मिळाल्याशिवाय कोणीच ॲडमिट करणार नाही. शेवटी बुधवारी संध्याकाळी वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सिटी स्कॅन केला. त्याचा रिपोर्टसुद्धा आला आणि माझी धावपळ सुरू झाली. बुधवारी रात्री जास्त त्रास व्हायला लागला म्ह्णून ओळखीच्या एका व्यक्तीच्या सांगण्यावरून त्यांना थेट रुबी हॉस्पिटलला घेऊन गेलो. पण तेथील परिस्थिती फारच गंभीर होती. वडिलांना घेऊन गेलो, पण तेथे एकही बेड रिकामा नव्हता. त्यामुळे त्यांनी दाखल करून घेण्यास नकार दिला. बाहेर लोकांना ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत आणि त्यांना होणार त्रास बघून तोपर्यंत वडील खूप घाबरले होते. त्यांचा त्रास हळूहळू वाढतच होता. काय करावे, कुठे घेऊन जावे, काहीच कळत नव्हते. माझे दोघे भाऊ, माझा मित्र मनोज सगळे जण सगळीकडे फोन करत होते. दवाखान्यात विचारपूस करत होते. परंतु कोठेही बेड मिळत नव्हता. शेवटी भावाच्या एका फोनला सकारात्मक उत्तर मिळाले आणि आम्ही वडिलांना सहारा हॉस्पिटल, दांडेकर पूल येथे घेऊन गेलो. डॉक्टर साहेबांनी खाली येऊन त्यांना चेक केले तर त्यांची ऑक्सिजनची पातळी खूपच खाली गेली होती. खूप विनंती केल्यावर त्यांनी त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि उपचार सुरू केले.
१५ एप्रिल : पहिल्या दिवशी रेमेडिसिविर दिले; परंतु अजूनही ४ ची आवश्यकता होती. सर्वांना कॉल केले, मेसेज केले आणि खूप धावपळ करून मित्रांच्या मेहनतीने कुठून कुठून ४ रेमेडिसिवर इंजेक्शन मिळवले. तेव्हा वाटले होते की आता सगळं व्यवस्थित होईल, परंतु नाही.
२० एप्रिल : २० एप्रिलच्या रात्री डॉक्टरांचा साहेबांचं फोन आला की वडिलांना ऑक्सिजन जास्त लागत आहे. आणि आपल्याकडे ऑक्सिजनची कमतरता आहे. ऐनवेळी ऑक्सिजनअभावी काही समस्या नको म्हणून त्यांना दुसऱ्या दवाखान्यात ॲडमिट करायला सांगितले. त्यादिवशी संपूर्ण देशात ऑक्सिजनचा तुटवडा होता. बाहेरच्या परिस्थितीबद्दल स्वतः डॉक्टर ही परिचित होते. बाहेर बेड मिळवणे अशक्य होते. त्यांनी खूप धावपळ करून कशेबशे ऑक्सिजन सिलिंडर मिळवले आणि ऑक्सिजनचा पुरवठा पूर्ववत झाला.
आजही धावपळच : अजूनही वडिलांना ऑक्सिजनचा त्रास होतच आहे. त्यांची लेव्हल कमीच आहे. डॉक्टर म्हणत आहेत की, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. मी गेली दोन दिवस त्यासाठी वणवण फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी निराशा हाती येत आहे. कुठेही व्हेंटिलेटर पलंग नाहीत. काही ठिकाणी जाऊन वेटिंग लिस्टमध्ये नंबर लावून आलो आहे. माझा हा प्रवास अजूनही अपूर्णच आहे. जेव्हा वडिलांना बरे वाटेल आणि ते सुखरूप घरी येतील तेव्हाच मी ही लढाई जिंकली असे म्हणेल.