मार्च २०२० पासून तीस लाखांची चाचणी
नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात ९ मार्च, २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून प्रत्येक कोरोना संशयिताची तपासणी करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. परिणामी रविवारपर्यंत (दि. १५) सायंकाळी सहापर्यंत सन २०११ च्या जनगणनेनुसार एकूण ९४ टक्के पुणेकरांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांतील शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता महापालिका हद्दीतील आजच्या लोकसंख्येच्या सुमारे ९० टक्के नागरिकांची म्हणजेच, तब्बल ३० लाख ४ हजार ७३९ जणांची कोरोना चाचणी पूर्ण झाली आहे.
कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून महापालिकेच्या विविध तपासणी केंद्रांवर कोरोना संशयितांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जात आहे. प्रारंभीच्या टप्यात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरालॉजी (एनआयव्ही) या राष्ट्रीय प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास साधारणत: ४८ तास म्हणजेच दोन दिवस लागत असत. कोरोना संसर्गाचे प्रमाण जसे वाढत गेले तसे तपासणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली. जून २०२० अखेर ‘आरटीपीसीआर’सह ‘अॅण्टीजेन’ ही अवघ्या काही मिनिटांत अहवाल देणारी कोरोना चाचणी शहरात सुरू झाली. यानंतर काही दिवसांतच खासगी प्रयोगशाळांनाही कोरोना चाचणीची परवागनी देण्यात आली.
संशयितांची कोरोना चाचणी, कोरोनाबाधितांचे विलगीकरण यामुळे पुण्याने पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेत इतर शहरांच्या तुलनेत यशस्वी मात केली असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांचा आहे. सातत्यपूर्ण चाचण्यांमुळे १५ ऑगस्टपर्यंत शहरातील कोरोना चाचणीचा एकूण आकडा ३० लाखांच्यापुढे गेला. यातील १६ टक्के म्हणजेच ४ लाख ९० हजार ४४६ पुणेकर कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले.
आजवरच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी ९८ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ही संख्या ४ लाख ७९ हजार ५०१ इतकी आहे. तर आजपर्यंत पुणे महापालिका हद्दीतील कोरोना संसर्गामुळे बळी गेलेल्यांची संख्या ८ हजार ८४७ आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधितांपैकी २ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या या कोरोनाबाधितांपैकी बहुतांश रूग्ण अन्य आजाराने ग्रासलेले होते. यातल्या बहुतांश रुग्णांनी वयाची साठी ओलांडलेली होती.
चौकट
१५ ऑगस्टच्या सायंकाळी ६ पर्यंतची स्थिती
एकूण कोरोना चाचण्या : ३० लाख ४ हजार ७३९
एकूण कोरोनाबाधित : ४ लाख ९० हजार ४४६
एकूण कोरोनामुक्त : ४ लाख ७९ हजार ५०१
कोरोनामुळे मृत्यू : ८ हजार ८४७
चौकट
महापालिका व खाजगी तपासणी केंद्रांवरील कोरोना चाचण्या व महापालिकेची ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ मोहीम, यामुळे शहरात अधिकाधिक कोरोना संशयितांची तपासणी झाली. आजमितीला कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी झाल्यानंतरही दिवसाकाठी आठ ते नऊ हजार संशयितांची तपासणी होत आहे.
चौकट
पुणे अव्वल
“देशातील इतर शहरांच्या तुलनेत पुण्यातील कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण पहिल्यापासूनच खूप चांगले राहिले आहे. यातून कोरोनाबाधितांचे निदान तत्काळ होऊ शकले. त्यांना लगेचच इतरांपासून विलग करता आले. परिणामी या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले व रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही पुण्यात ९८ टक्के इतके सर्वाधिक राहिले आहे.”
डॉ. संंजीव वावरे, साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहायक आरोग्य अधिकारी, महापालिका