लोकमत न्यूज नेटवर्क
नसरापूर बाजारपेठेत व इतरत्र विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना ॲंटिजेन चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधिताची कोविड केअर सेंटरमध्ये ताबडतोब रवानगी करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन राजगडचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी केले आहे. नसरापूर येथे बाहेर फिरणाऱ्या ७५ जणांची चाचणी पोलिसांनी केली. यात १ जण पॉझिटिव्ह आढळला.
नसरापूर (ता.भोर) येथे चेलाडी फाटा व बनेश्र्वर चौकात आरोग्य विभागाच्या साहाय्याने अँटिजन टेस्ट घेण्यात आल्या याकरिता आरोग्य अधिकारी डॉ. जयदीप कापशिकर, आरोग्य सेविका, राजगडचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे, बिट हवालदार प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक नागरिक कडक निर्बंध असतानाही काही महाभाग विनाकारण फिरतात. अनेक नागरिक पोलिसांना दवाखान्यात चाललोय, मेडिकलमध्ये चाललोय, दवाखान्यात डबा देण्यासाठी चाललोय आदी कारणे देत होते. मात्र, पोलिसांनी कारणे ऐकून न घेता त्यांची तपासणी केली. मोकाट वीरांना आवर घालण्यासाठी तसेच सुपर स्प्रेडर समाजात फिरून संसर्ग वाढवणाऱ्याचा अटकाव यातून केला जाईल. या पार्श्वभूमीवर ठरवून दिलेल्या वेळेनंतर दुकाने सुरू ठेवून लपूनछपून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना आणि विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना लगाम बसावा यासाठी त्यांची अँटिजन कोरोना चाचणी करण्याचा निर्णय राजगड पोलिसांनी घेतल्याने या मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना तपासणी केली जात आहे.
सोबत : नसरापूर (ता.भोर) येथे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना अँटिजेन चाचणी केली जात आहे.