लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील माध्यमिक शाळा सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर दैनंदिन कोरोना चाचणीचे प्रमाण गेल्या तीन-चार दिवसांपासून हजार ते दीड हजाराने वाढले असले, तरी करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी (तपासणी) च्या तुलनेत कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण मात्र ७ टक्क्यांच्या आतच असल्याचे समाधानकारक चित्र शहरात आहे़
रविवारी शहरात ४ हजार ८२ जणांनी कोरोना चाचणी केली, यापैकी केवळ २९० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ मात्र, यातील बहुतांशी जण हे लक्षणेविरहित आहेत़ दरम्यान, शहरातील सक्रिय रुग्ण (अॅक्टिव्ह) ही गेल्या आठ महिन्यांत प्रथमच तीन हजाराच्या आत आली आहे. आजमितीला शहरात केवळ २ हजार ९०९ सक्रिय रुग्ण आहेत़ यापैकी सुमारे ७० टक्के रुग्ण हे होम आयसोलेशन (गृहविलगीकरण) मध्येच आहेत़ तसेच, हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे उपचाराला प्रतिसाद देत असल्याची माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी ‘लोकमत’ला दिली़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरात ४२० जण कोरोनामुक्त झाल्याची नोंद घेतली आहे़ तर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये २५० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १५५ जण व्हेंटिलेटरवर आहेत़ शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या आजमितीला ६४२ इतकी आहे़ आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६४७ इतकी झाली आहे़
शहरात आजपर्यंत ९ लाख २९ हजार २६१ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ५९८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी १ लाख ७२ हजार ४२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़