पुणे : Covid 19- तिसऱ्या लाटेत कोरोना रुग्णसंख्येने २१ जानेवारी रोजी आजवरचा उच्चांक गाठला. या दिवशी शहरातील एका दिवसाचा पॉझिटिव्हिटी रेट ४० टक्के (coronavirus positivity rate) नोंदवला गेला. यापूर्वी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत एका दिवसाचा सर्वाधिक पॉझिटिव्हिटी रेट २९ टक्के नोंदवला गेला होता. तिसरी लाट अधिक संसर्ग पसरविणारी असली तरी गृहविलगीकरणातील रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे. सौम्य लक्षणे सात-आठ दिवसांत कमी होऊन रुग्ण बरे होत आहेत.
महाराष्ट्रातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळून आला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णसंख्येने १५०० चा टप्पा पार केला. पहिल्या लाटेचा उच्चांक १६ सप्टेंबर २०२० रोजी नोंदवला गेला. त्यादिवशी शहरात ७१६२ चाचण्या झाल्या. त्यापैकी २१२० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. १६ सप्टेंबर रोजी पॉझिटिव्हिटी रेट २९.६० टक्के होता.
दुसऱ्या लाटेमध्ये ८ एप्रिल २०२१ रोजी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला. त्यादिवशी २३ हजार ५९५ चाचण्या झाल्या. त्यापैकी ७०१० रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आणि पॉझिटिव्हिटी रेट २९.७० टक्के इतका होता. तिसऱ्या लाटेमध्ये २० जानेवारी २०२२ रोजी गेल्या दोन वर्षांतील रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला. यादिवशी २० हजार ३३८ चाचण्या झाल्या आणि त्यापैकी ८३०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्हिटी रेट ४०.८० टक्के नोंदवला गेला.
तिसऱ्या लाटेमध्ये १७ ते २३ जानेवारी या आठवड्यात सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. महापालिकेच्या अहवालानुसार या कालावधीत शहरात १ लाख ९ हजार ३५० चाचण्या झाल्या. त्यापैकी ४१ हजार २३० रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. बाधितांचा दर ३७.७० टक्के असल्याचे निदर्शनास आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून तिसरी लाट ओसरण्यास सुरुवात होईल, असा निष्कर्ष वैद्यकतज्ज्ञांनी वर्तविला आहे.
ओमायक्रॉनचा वाढता आलेख :
कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवला गेला असताना शहरात या आठवड्यात ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येचा आलेखही वाढता राहिला. १७ ते २३ जानेवारी या काळात शहरात ४६० ओमायक्रॉनबाधित आढळून आले आहेत. पुणे शहरात २३ जानेवारीपर्यंत एकूण १००२ ओमायक्रॉनबाधित रुग्णांचे निदान झाले आहे.