पुणे : Pune City Corona Update- कोरोनाच्या ओमायक्रॉन (omicron spread in pune) विषाणूचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात पसरला असून, शहरात एकूण होणाऱ्या कोरोना चाचणी (covid 19 test in pune) च्या तुलनेत बाधितांचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. आज शहरात केलेल्या एकूण १९ हजार ३४ तपासण्यांपैकी ८ हजार २४६ जण बाधित आढळून आले आहेत. शहरातील पॉझिटिव्हटी रेट ४३.३२ टक्क्यांवर गेला आहे. शहरातील एकूण लोकसंख्यपैकी आत्तापर्यंत ६ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही त्या तुलनेत मोठ्या प्रमाणात असून, आज दिवसभरात ७ हजार ३६८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. विविध रूग्णालयात सध्या ४८ रूग्ण व्हेंटिलेटरवर, २४ जण आयुसीयूमध्ये तर ३०१ रूग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ४५ हजार ९५० इतकी झाली असून, यापैकी ९७ टक्के रूग्ण हे गृहविलगीकरणातच आहेत.
शहरात आत्तापर्यंत ४२ लाख १९ हजार १३९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यापैकी ६ लाख ८० जण कोरोनाबाधित आढळून आले. यातील ५ लाख ४४ हजार ९४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १८१ जण दगावले आहेत.