पुणे : कोरोनाकाळात ड्युटीवर नेमण्यात आलेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे मृत्यू आल्यास त्यांना २५ लाख रुपयांची मदत आणि वारसाला नोकरी देणार आहे. ज्यांना कोविड ड्युटी नव्हती आणि जे कर्मचारी कंटेंमेन्ट झोनमध्ये राहात नव्हते अशा कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मदत देण्याचा आग्रह पालिका पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.
लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर उतरुन स्वच्छतेपासून आरोग्यापर्यंतच्या सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही कोरोनाची लागण झाली. यातील ५१ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला. कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना महापालिकेकडून ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु, नंतर त्यामध्ये बदल करून २५ लाख रुपये मदत देण्याचा ठराव मान्य केला.
महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश कायम कर्मचारी होते. तर, हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कंत्राटी कर्मचारी होते. यामध्ये परिचारिका, डॉक्टर, अभियंते, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, विविध विभागांत काम करणारे अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.
या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याचा ठराव होऊनही अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. यावरून सत्ताधारी पक्षावर टीका होऊ लागल्याने ही मदत देण्याबाबत पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. याविषयातील एरव्ही माहिती अहवाल प्रशासनाकडून मागविला आहे. दरम्यान , प्रशासनाने दिलेल्या अहवालात यातील काही जण कोविड ड्युटीवर नव्हते, तसेच काही जण तर त्यावेळच्या कंटेंमेन्ट झोनमध्येही राहण्यास नव्हते. मग, त्यांना कोरोना योद्धा म्हणून मदत कशी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांनाही मदत देण्याबाबत पालिका पदाधिकाऱ्यांचा दबाव टाकण्यात येत असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.