पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या योजने अंतर्गत जिल्ह्यात सात ठिकाणी सोमवार ते गुरुवार दरम्यान दिवस-रात्र सलग 75 तास कोरोना लसीकरण सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेला हा उपक्रम खरच सुरू आहे का हे पाहण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सोमवारी मध्यरात्री काही लसीकरण केंद्रांना अचानक भेट दिली.
जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मिशन कवच कुंडल अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, याचा एक भाग म्हणून जिल्ह्यात सात ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण मोहिम सुरू आहे. यामध्ये बारामती, दौंड, हवेली, खेड आणि मुळशी तालुक्यात हे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. दिवसभर काम करणारे कामगार, नोकरदार लोकांना रात्रीच्या लसीकरणाचा लाभ होतो. 'मिशन कवच कुंडल' कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात करण्यात आले. ही मोहीम जोरदारपणे सुरु आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मध्यरात्री जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी आपल्या टीमसह वाघोली केंद्राला भेट दिली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आणि पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आदी उपस्थित होते. देशमुख म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये या विशेष मोहिमेमध्ये मनुष्यबळाअभावी लसीकरण मोहिम पार पाडण्यास अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यात या 7 ठिकाणी दिवस-रात्र सलग 75 तास लसीकरण बारामती : महिला रुग्णालय, दौंड : उपजिल्हा रुग्णालय, हवेली : प्रा. आ. केंद्र लोणीकाळभोर, प्रा.आ. केंद्र खडकवासला, प्रा.आ. केंद्र वाघोली , खेड : ग्रामीण रुग्णालय चाकण, मुळशी : उपकेंद्र हिंजवडी
शंभर टक्के लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट सध्या राज्यात सर्वाधिक लसीकरण पुणे जिल्ह्यात झाले असले तरी, येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शंभर टक्के पात्र लाभारथ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून "मिशन कवच कुंडल " अभियान हाती घेण्यात आले आहे. यासाठी गाव आणि नगरपालिका स्तरावर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. प्रशासना सोबतच लोकप्रतिनिधी आणि खाजगी संस्थांना बरोबर घेऊन ही अभियान राबविण्यात येत आहे.- डाॅ.राजेश देशमुख, जिल्हाधिकारी