Corona Vaccination Baramati: उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत कोरोना लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण मोहिमेचे वाजले तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 05:21 PM2021-05-10T17:21:10+5:302021-05-10T17:23:37+5:30
नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन.....
बारामती: लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बारामतीत लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजले आहे.सोमवारी बराच वेळ थांबूनही लस न मिळाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. लसीकरण केंद्रावर हे चित्र नित्याचेच झाले आहे. पोलीस बंदोबस्तात लसीकरण करण्याची वेळ आली आहे. १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी केवळ महिला रुग्णालयात आणि ग्रामीण भागात होळ प्राथमिक आरोग्य केंद्रावर केवळ या दोनच ठिकाणी प्रत्येकी १०० नागरिकांना लस दिवसाला मिळणार आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, नागरिकांनी लसीकरण करण्यासाठीची प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी ग्राह्य धरली जाते.या वयोगटासाठी ‘स्पॉट रजिस्ट्रेशन’ची सोय नाही ऑनलाईन नोंदणी (ओपन)सुरु झाल्यावर अवघ्या चार ते पाच मिनिटात १०० जणांची नोंदणी पूर्ण होते. ही नोंदणी पूर्ण झाल्यावर पुढील नोंदणी अॅपवर घेतली जात नाही.अॅपवर नोंदणी झालेल्या १०० जणांची यादी आरोग्य विभागाला पाठविण्यात येते.त्यानंतर त्याच १०० जणांना लसीकरण करण्यात येते. ही यादी रुग्णालयाबाहेर रोज लावण्यात येते. तसेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन नोंदणी यशस्वी झाल्याचा अनेकांना ‘मेसेज’ येतो. मात्र,याच ठिकाणी अनेकांची गोंधळ होते. नोंदणी करणाऱ्यांना दिवस आणि तारीख मिळणे आवश्यक आहे. याबाबतचा ‘स्लॉट’ मिळाल्यानंतरच सबंधितांनी लसीकरणासाठी यावे.
४५ वर्ष वयोगटाच्या पुढील नागरिकांसाठी आलेली लस ३६ लसीकरण केंद्रांमध्ये विभागुन देण्यात येते. खासगी लसीकरण केंद्रांला सध्या लस पुरविणे शक्य नाही.
प्रत्येक केंद्रावर १०० जणांना लसीकरण करण्यात येत आहे. तसेच ७० टक्के लस दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना,तर ३० टक्के प्रथम डोस घेणाऱ्या ४५ वर्षापुढील नागरिकांना देण्यात येत आहे. यामध्ये देखील आॅनलाईन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना लसीकरणास प्राधान्य देण्याबाबत शासनाच्या सूचना आहेत. दुसऱ्या डोससाठी नागरिकांना ऑनलाईनची गरज नाही,त्यांनी पहिल्या डोसच्या वेळीच नोंदणी केली आहे. त्यामुळे महिला रुग्णालयात सकाळी ९ वाजता पहिल्या ७० नागरिकांना टोकन देण्यात येते.मात्र, यावेळी संख्या अधिक असल्याने वाद होतात.
नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी यशस्वी झाल्याशिवाय लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये,असे आवाहन डॉ. खोमणे यांनी केले आहे.दुसरा डोस पूर्ण केल्याशिवाय पुढील लसींचा पुरवठा केला जाणार नसल्याची केंद्र सरकारने सूचना दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.
———————————————
...यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका
सोमवारी चार तास रांगेत थांबलेल्या स्मिता पडळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ,मी पहिली लस खासगी रुग्णालयात घेतली आहे.मात्र, लस नसल्याने ते केंंद्र बंद आहे.त्यामुळे दुसऱ्या डोससाठी शासकीय रुग्णालयात यावे लागले. मात्र,या ठिकाणी लसीकरण प्रक्रियेबाबत कोणीही माहिती दिली नाही. नियोजन नसल्याने मोठी गर्दी होते.यामध्ये कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे.