पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ५५ हजार लसीकरण डोस उपलब्ध झाल्याची बातमी पसरताच बुधवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडे धाव घेतली. शहरामधून नागरिकांची वाहने लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रावर आल्याने अनेक ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. गावकऱ्यांनी अशा पद्धतीच्या लसीकरणावर आक्षेप नोंदवला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लसीकरण डोसचा तुटवडा निर्माण झाल्याने लोक लसीकरणासाठी या सेंटर वरून त्या सेंटरवर वणवण फिरत आहेत. कोरोना लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये राज्य सरकारच्या मार्फत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण सुरू झाले आहे. या गटातील लसीकरणासाठी नोंदणी करून उपलब्ध लसीकरणाचे ठिकाण नागरिकांना निश्चित करून दिली जाते. गेल्या दोन दिवसापासून या वयोगटातील लसीकरणाच्या मोहिमेसाठी होणाऱ्या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याने एक-दोन मिनीटातच कोठा पूर्ण होतो अशी स्थिती आहे.
कोरोना लसीकरण करून घेण्यासाठी 18 ते 44 हा वयोगट उत्साही असल्याने ज्या केंद्रावर लसीकरणासाठी नोंदणी मिळेल त्या केंद्रावर जाऊन लसीकरण करण्याची या गटाची तयारी आहे. बुधवारी (दि.5) रोजी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक नागरिकांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राची निवड केली. त्यामुळे जिल्ह्यातील जुन्नर वेल्हे मुळशी खेड शिरूर बोर पुरंदर या तालुक्यातील लसीकरण केंद्रावर पुण्यातील नागरिकांची गर्दी उसळली. त्यास ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला. परंतु लसीकरणासाठी नाव नोंदणी आणि केंद्र निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला असल्याने ठरलेल्या नोंदणी नुसार लसीकरण करण्यात आले.
18 ते 40 वयोगटातील लसीकरण आतील नोंदणी अगोदर झाल्याने काही तासातच लसीकरणाचा कोटा पूर्ण झाला दुपारनंतर ही केंद्र बंद करण्यात आली. ग्रामीण भागातील या गटातील नागरिकांना लस न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. ग्रामीण भागातील केंद्रही ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांसाठी सुरू ठेवावीत आणि शहरातील केंद्रांवर शहर आणि परिसरातील नागरिकांना तर लसीकरण करावे म्हणजे गोंधळ होणार नाही अशी भूमिका अनेक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकार्यांकडे व्यक्त केली.