Corona Vaccination : कोरोना लसीकरण वेगानं पूर्ण करण्याचा प्रयत्न, परदेशातूनही लस खरेदीची सरकारची तयारी : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 04:49 PM2021-05-31T16:49:31+5:302021-05-31T16:50:08+5:30
प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे.
पुणे : राज्यासह पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत खबरदारी घेण्याची गरज आहे. परदेशातून लस खरेदी करण्याचीही शासनाची तयारी आहे. लस उत्पादक 'भारत बायोटेक'च्या प्लॅन्टसाठी पुण्यात तातडीनं जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तिथे लवकरच लसीचं उत्पादन सुरू होईल. या माध्यमातून कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगानं पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते हडपसर येथे पहिल्या 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन' सेंटरचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले,पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे. हडपसरमधील ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांसाठी सुलभ सेवा देणारे ठरेल, असा मला विश्वास आहे. कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यास राज्य सरकार कटिबध्द आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आपण यशस्वीपणे सामना करत आहोत. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत कोणत्याही परिस्थितीत बेसावध राहून चालणार नाही. राज्य शासनानं तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत बालरोग तज्ज्ञांचाही टास्क फोर्स तयार केला आहे. पावसाळ्यात कोरोना सोबत इतर संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, याबाबत दक्ष राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी एकजुटीनं कोरोना संकटाचा सामना करायचा आहे. कोरोनाला हरवण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं नागरिकांनी काटेकोरपणे पालन करा असेही पवार यांनी यावेळी सांगितले.