पुणे: कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम पुणे,पिंपरी शहरासह ग्रामीण भागात देखील सुरू आहे.मात्र, या दरम्यान कधी लसींचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे तर कधी तो संपल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. लसीकरणाच्या मोहिमेत नागरिकांना होणारा मनस्ताप नक्की कधी संपणार हा प्रश्नच आहे.
राज्य सरकारकडून पुण्याला लसींचा साठा उपलब्ध न झाल्यामुळे चार दिवस लसीकरण थांबविण्यात आले होते.त्यामुळे कोरोनाने आधीच टेन्शनमध्ये असलेल्या पुणेकरांना याचा मोठा फटका बसला. बुधवारी काही प्रमाणात लसी उपलब्ध झाल्या. त्यामुळे लसीकरण पुन्हा सुरू झाली. पण यावेळी एक धक्कादायक बाब उघडकीस आली.कोविन अँपवरून लसीकरणासाठी नाव नोंदविलेल्या एका कुटुंबातील तिघे जण लसीकरणासाठी केंद्रावर गेले. गर्दी असल्यामुळे बराच वेळ रांगेत देखील उभे राहिले.याचदरम्यान लसी संपल्या अन् लसीकरण थांबविण्यात आले.यामुळे रिकाम्या हाताने आणि प्रचंड उद्विग्नेतेने हे तिघे जण घरी परतले. खरी संतापजनक बाब आता आहे.म्हणजे घरी पोहचल्यावर जेव्हा यांनी कोविन अँप पाहिले त्यात चक्क या तिघांचे लसीकरण पूर्ण झाल्याचा मेसेज त्यांना प्राप्त झाला होता.
या धक्कादायक प्रकाराबाबत बोलताना अतुल भिडे म्हणाले, माझे वडील (वय 88)आई (वय 86) व सासरे (वय 88) यांच्या लसीच्या दुसऱ्या डोससाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घेतली. आम्हाला नऱ्हे सिंहगड कॉलेज येथे ३० एप्रिलला सकाळी ११ ते १ अशी वेळ मिळाली. मी त्या तिघांनाही घेऊन बरोबर पावणे अकरा वाजता लसीकरण केंद्रावर पोहचलो. तेव्हा तिथे प्रचंड गर्दी होती. तेथील अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट पत्रही दाखवलं.परंतु त्यांनी तुम्हाला रांगेतच यावे लागेल कारण वेगळी अशी सोय नाही. ही सर्व रांगेतील लोकं सकाळी सहापासून रांगेत उभी आहेत. मी नाईलाजास्तव रांगेत उभा राहिलो. परंतु थोड्याच वेळात लस संपल्याचे जाहीर करण्यात आले.त्यामुळे मी तिन्ही वृद्ध लोकांना घेऊन घरी आलो. घरी येऊन कोविन ॲप उघडून पाहिले तेव्हा असे दिसले की, या तीनही लोकांच्या नावावर लस दिल्याचा दाखला दिसत होता. त्यामुळे आता मला त्यांना कुठल्याही प्रकारे दुसऱ्या डोससाठी अपॉइंटमेंट घेता येणे शक्य नाही.नेमकं यापुढे काय विचारावे या संभ्रमात हे कुटुंब आहे.
याविषयी संदीप खर्डेकर म्हणाले,प्रशासनाने आजवर आलेल्या लसी व त्यांचे एकूण सर्वच केंद्रावर झालेल्या वाटपाचा तपशील जाहीर करावा.त्याचप्रमाणे प्राप्त लसींचे सर्व केंद्रावर समान वाटप केले जावे व ज्यांनी अँपवर अपॉइंटमेंट घेतली आहे त्यांचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. कारण लसीकरणाच्या दरम्यान सामान्य नागरिकांची प्रचंड ससेहोलपट होत आहे. तसेच कोविन अँपमध्ये काही तांत्रिक दोष असल्यास त्याबाबत आवश्यक कारवाई करावी.