जेजुरी: जेजुरी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी ऑनलाइन बुकिंगनुसार लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन बुकिंगमुळे स्थानिकांना लस मिळत नसल्याने जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन स्थानिकांना प्रथम लसीकरण द्या मगच इतरांना लसीकरण करण्याचा आग्रह धरत लसीकरणच बंद पाडले. जेजुरी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सुटकाही केली.
जेजुरी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटासाठी जेजुरी ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. ऑनलाइन पद्धतीने लसीकरण नोंदणी होत असल्याने दररोज पुणे व इतर ठिकाणची लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असून बाहेरगावाहून येथे येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता ही जास्त असल्याने जेजुरीकर नागरिक व लोकप्रतिनिधी मध्ये मोठा असंतोष आहेयाच कारणास्तव शनिवारी (दि.८) सकाळी मात्र या असंतोष उफाळून आला आणि नगराध्यक्षांनी नगरसेवक अजिंक्य देशमुख, नगरसेविका रुक्मिणी जगताप तसेच सेनेचे शहरप्रमुख विठ्ठल सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांना सोबत घेत ग्रामीण रुग्णालयात जाऊन लसीकरणच बंद पाडले.
रुग्णालय प्रशासनाने दररोजच्या लसीकरणात ५० टक्के स्थानिकांना ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करून लसीकरण करावे अशी आग्रही मागणी करीत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरू करूच नका असा आग्रह ही त्यांनी धरला होता. वातावरण चांगलेच तणावाचे बनले होते. यात पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. शेवटी तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी ही रुग्णालयात येऊन आंदोलक कार्यकर्त्यांच्या भावना समजावून घेऊन तुमचे म्हणणे शासन दरबारी मांडून यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच पोलिसांनी ही आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतले
प्रशासनाकडून योग्य ती दाखल घेतली जाईल असे आश्वासन मिळाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरळीत पार पडले. दिवसखेर आज १२० जणांना लसीकरण करण्यात आले .