प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. दररोजची रुग्णसंख्या २० वरून ५०-६० पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बूस्टर डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. सध्या शहरात १८ ते ४५ या वयोगटातील १९ लाख ३३ हजार ५८८ जणांचा दुसरा डोस घेऊन झाला आहे. शहरात सध्या सुमारे दीड लाख नागरिक बूस्टर डोससाठी पात्र आहेत. त्यापैकी केवळ ४९ हजार ८१३ नागरिकांनी डाेस घेतला आहे.
बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये १८ ते ४५ या वयोगटातील २२ हजार ६८३ जण; तर ४५ ते ५९ या वयोगटातील २७ हजार १३० नागिरकांचा समावेश आहे. ज्या नागरिकांनी जून २०२१ मध्ये दुसरा डोस घेतला, त्यांना १० एप्रिलपासून तिसरा डोस देण्यात सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने १८ वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर अर्थात दक्षता डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने झाले आहेत, त्यांना खासगी केंद्रांवर सशुल्क लस घेता येत आहे. अनेक नागरिकांना दुसरा डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले असतील तर शासकीय यंत्रणेकडून मेसेज पाठवले जात आहेत. मात्र, बहुतांश नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
बूस्टर डाेससाठी माेजावे लागताहेत पैसे
- सध्या केवळ ६० वर्षे वयावरील व्यक्तींनाच सरकारी लसीकरण केंद्रामध्ये मोफत बूस्टर डोस दिला जात आहे. १८ ते ५९ वयाेगटातील लाभार्थ्यांना खासगी रुग्णालयांमध्ये सरकारने ठरवलेल्या दरानुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशीच्या बूस्टर डोससाठी २२५ रुपये आणि १५० रुपये सेवा शुल्क असे एकूण ३७५ रुपये शुल्क आकारले जात आहेत.
- तिसऱ्या लाटेमध्ये अनेकांना कोरोनाची लागण झाली, मात्र लसीकरण झालेले असल्यामुळे सौम्य लक्षणे उद्भवली आणि बहुतांश रुग्ण घरीच बरे झाले. चौथ्या लाटेची चिन्हे दिसत असताना नागरिकांनी निष्काळजीपणा न करता लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
...म्हणून मिळेना प्रतिसाद
सध्या १८ ते ५९ या वयोगटातील नागरिकांसाठी केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध आहेत. त्यामुळेही लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असल्याची शक्यता आहे. तसेच शहरातील काही खासगी रुग्णालयांनी लसीकरण केंद्र बंद केल्याचाही परिणाम दिसत आहे.
केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाची अंमलबजावणी महापालिकेकडून केली जात आहे. त्यानुसार १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस उपलब्ध आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना बूस्टर डोसची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरू आहे.
- विक्रम कुमार, महापालिका आयुक्त
लस घेतल्यानंतर ७ ते १४ दिवसांमध्ये अँटीबॉडी विकसित होण्यास सुरुवात होते. त्यानंतर साधारण सहा ते नऊ महिने अँटीबॉडी टिकतात, असे आजवरच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी बूस्टर डोस घेणे आवश्यक आहे.
- डाॅ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन