पुणे : पुणे शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्येमुळे चिंतेचे वातावरण आहे. पण महापालिकेकडून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम जोरदार सुरू आहे. मात्र नागरिकांना लसीकरणात काही अडचणी येत आहे. परंतू, आता महापालिकेच्या शहरातील पाच केंद्रावर २४ तास लसीकरण सुरू राहणार आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून दिली आहे.
पुण्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासन आणि आरोग्य विभाग यंत्रणा युद्ध पातळीवर कार्यरत आहे. मात्र अशावेळी नागरिकांकडूनच कोरोना विषयक नियमावलीचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. त्यात विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत तब्बल 13 कोटींचा दंड वसूल करून झाला आहे. तरीदेखील परिस्थितीचे गांभीर्य पुणेकरांना नाही अशी स्थिती आहे.
आता शहरातील पुणे महापालिकेच्या पाच लसीकरण केंद्रांवर २४ तास लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात संचार निर्बंध लागू असल्याने रात्री अकरानंतर केवळ आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर लसीकरण करुन घेऊ शकणार आहे.
या केंद्रांमध्ये येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटल, कोथरूड येथील सुतार दवाखाना, वारजे येथील लायगुडे हॉस्पिटल, हडपसर येथील मगर हॉस्पिटल आणि कमला नेहरू हॉस्पिटलचा समावेश आहे.