पुणे : शहरात गुरूवारी महापालिकेच्या ५४ केंद्रांवर कोव्हिशिल्ड तर १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध राहणार असून, या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी १०० डोस पुरविण्यात आले आहेत. ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्यासाठी गुरूवारी (दि.२७) सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ६० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईमेंट घेतलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे. तर २० टक्के लस ही ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर आॅन दि स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार आहे.
तसेच २० टक्के लस ही ४५ वर्षेवरील नागरिकांना की ज्यांनी ८४ दिवसांपूर्वी ( दि.२ मार्चपूर्वी) पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहे.
------------------
कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसही उपलब्ध
ज्या नागरिकांनी २९ एप्रिलपूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशा नागरिकांना गुरुवारी १५ केंद्रांवर दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस मात्र कोणालाही दिला जाणार नाही.
------------------------