सर्वच केंद्रांवर फक्त दुसरा डोस मिळणार
पुणे : कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा न झाल्याने, गुरूवार (दि.१३) पासून शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर केवळ दुसरा डोस मिळणार आहे. यात कोव्हिशिल्ड लसीचाच समावेश असून, ज्यांनी २९ मार्च, २०२१ पूर्वी लस घेतली आहे अशा नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे.
लसीचा तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, राज्य शासनाकडून नव्याने लस आल्याशिवाय लसीचा पहिला डोस कोणालाच उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान ही लस कधी प्राप्त होईल, ती १८ ते ४४ वयोगटातील वर्गाला देणार का याबाबत कुठलीच निश्चिती नसल्याने, शहरातील पहिल्या डोसचे लसीकरण अनिश्चित काळासाठी आता पूर्णत: स्थगित झाले आहे़ यामुळे आॅनलाईन नोंदणीही बंद असून, दुसऱ्या डोस करिता प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्यक्रम या प्रमाणे लस दिली जाणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रांवर महापालिकेकडून गुरूवार करिता १०० लसीचे डोस पुरविण्यात आले आहेत.
शहरातील ११९ लसीकरण केंद्रांवर केवळ कोव्हिशिल्ड लस उपलब्ध असून, ४५ वर्षांवरील नागरिकांना याच लसीचा दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी दिली.
-----------------
कमला नेहरू, राजीव गांधी रूग्णालयातील लसीकरणही बंद राहणार
१८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी ऑनलाईन नोंदणी करून, कमला नेहरू व राजीव गांधी रूग्णालयात लस उपलब्ध होत होती. मात्र शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही केंद्रांवरील १८ ते ४४ वयोगटातील वर्गाचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र येथे ४५ वर्षे वयावरील नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.
------------------------