पुणे : शहरातील लसीकरण केंद्र ही महापालिकेच्या खर्चाने माननीयांच्या प्रचाराचे प्रमुख केंद्र बनत चालल्याने, आजअखेर महापालिका आयुक्तांनीच यावर चाप आणला आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन व महापालिका आयुक्त यांनी दिलेल्या सूचना फलकांव्यतिरिक्त इतर कोणतेही खासगी बोर्ड व खासगी जाहिराती लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लावू नयेत अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
दरम्यान, या सूचनेचे उल्लंघन केल्यास जाहिरातबाजी करणाऱ्यांवर ‘महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिता अधिनियम १९९५’ अन्वये कारवाई करण्याची सूचना संबंधित महापालिका सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. तर कोणतीही व्यक्ती लसीकरण सत्राच्या ठिकाणी अडथळा निर्माण करत असेल तर संबंधित व्यक्तीविरूध्द नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत.
याचबरोबर नावनोंदणी शिवाय येणाऱ्या नागरिकांची स्वतंत्र रांग करून, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीच त्यांची नोंदणी करावी व महापालिकेचे टोकन त्यांना द्यावे तसेच लसीकरण सकाळी दहा वाजता सुरू करण्याचेही आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.यामुळे यापुढे माननीयांचे फोटो असलेले टोकन अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांचा टोकन वाटपातील हस्तक्षेप, ओळखीच्या नागरिकांनाच वितरण आदी गोष्टींना आळा बसणार आहे.
आयुक्त विक्रम कुमार यांनी आपल्या आदेशात लसीकरण केंद्रांवर केवळ ज्या व्यक्तींनी कोविन पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने नोंद केली आहे. तसेच जे नागरिक स्वत:चे लसीकरणासाठी आले आहेत, त्यांनाच केंद्राच्या आवारात प्रवेश द्यावा. त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही लसीकरण केंद्राच्या आवारात प्रवेश देऊ नये असे स्पष्ट केले आहे़ तर लसटोचक यांचे व्यतिरिक्त कोणीही लस कुपिला व इतर लसीकरण साहित्याला हात लावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. लसीकरण केंद्राच्या बाहेर कोविड लस कुपीला कोणीही घेऊन जाऊ नये तसे आढळून आल्यास केंद्र प्रमुखांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी लागलीच जवळच्या पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.
आयुक्तांनी दिलेल्या सूचना :
* शासनाने ठरवून दिलेल्या वयोगटानुसारच लसीकरण करावे
* लसीकरण झाल्यानंतर कोविन पोर्टलवरील प्रमाणपत्राची प्रत नागरिकांना देण्यात यावी.
* लसीकरण केंद्रावरील गर्दी व्यवस्थापन व कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिस बंदोबस्त घ्यावा.
* नोंदणीशिवाय कोणासही लस देऊ नये
* कोविड लसीची नासाडी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
* विना परवागनी आरोग्य कर्मचाºयांव्यतिरिक्त कोणासही लसीकरण सत्रामध्ये प्रवेश देऊ नये
* लस उपलब्धतेबाबतचा योग्य तीच माहिती लसीकरण केंद्रांवर लावावी.
----------------
यांना मिळणार प्राधान्य
लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांमध्ये प्रथम दिव्यांग नागरिक, दुसऱ्या डोसचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक व त्यानंतर आॅनलाईन नोंदणी केलेले पहिल्या डोसचे लाभार्थी यांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर ऑन दि स्पॉट नोंदणीसाठी आलेल्या पहिल्या डोसच्या लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे.
---------------------------