Corona Vaccination Pune : पुणे जिल्ह्यात सहा महिन्यांत केवळ 11 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 09:40 PM2021-06-21T21:40:50+5:302021-06-21T21:48:29+5:30
पहिला डोस घेतलेले 42 टक्के लोक ; लस उपलब्ध झाल्यानंतरच लसीकरणाला वेग
पुणे : राज्यासह जिल्ह्यात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली, पण सहा महिन्यांत जिल्ह्यातील केवळ 11 टक्के लोकांचे कोरोना लसीकरण पूर्ण म्हणजे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत. तर 42 टक्के लोकांनी पहिला डोस झेतला आहे. दरम्यान केंद्र शासनाने आता पुरेशा प्रमाणात लसची डोस उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले असून, जिल्ह्यात दिवसाला दीड लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.
जिल्ह्यात 15 जानेवारीनंतर कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला फेब्रुवारी महिन्यात चांगला वेग आला होता. पुणे जिल्ह्यात दिवसाला 50-55 हजार लोकांचे लसीकरण करण्याचा रेकॉर्ड देखील केले. परंतू केंद्र शासनाने 18 ते 45 वयोगटातील सरसकट नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि मागणी वाढल्याने लसीच्या डोसेसचा तुटवडा निर्माण झाला. लस उपलब्ध होत नसल्याने पुणे शहरामध्ये काही दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ देखील प्रशासनावर आली. परंतु सध्या अत्यंत धीम्या गतीने लसीकरण सुरू असून, केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त लस उपलब्ध होण्याच्या प्रतिक्षेत प्रशासन आहे.
जिल्ह्यात आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स ज्येष्ठ नागरिक यांचे देखील लसीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. तर 18 ते 44 दरम्यान केवळ 22 हजार 88 म्हणजे एक टक्का लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
-------
- जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी एकूण अपेक्षित लाभार्थी : 57 लाख 75 हजार 426
- पहिला डोस घेतलेले नागरिक : 24 लाख 53 हजार 456 (42 %)
- दूसरा डोस घेतलेले नागरिक : 6 लाख 55 हजार 606 ( 11 टक्के )
-------
18 ते 44 वयोगटातील केवळ एक टक्का लोकांचे लसीकरण
केंद्र शासनाने 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे देखील लसीकरण सुरू केले आहे. जिल्ह्यात या वयोगटातील सुमारे 25 लाख 35 हजार 426 लाभार्थी अपेक्षित आहेत. यापैकी 4 लाख 16 हजार 765 लोकांनी पहिला तर दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या केवळ 22 हजार 88 म्हणजे एक टक्का ऐवढी आहे.
-------