पुणे : एकीकडे लसीकरणाचे प्रमाण वाढवले जात असतानाच आता लसींचा साठा संपतोय का काय अशी भीती प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांची संख्या वाढत असूनही लसींचा पुरेसा साठा केला जात नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्मचारी मात्र ही परिस्थिती येणार नाही असा दावा करत आहेत.
कोरोनाचा पहिला रुग्ण सापडून वर्ष होत असतानाच लसीकरण मोहिमेने जोर पकडला आहे. पुणे महापालिकेतर्फे शहरात , जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागांत आणि पिंपरी चिंचवड या सगळ्या ठिकाणी खासगी आणि सरकारी केंद्रांमध्ये लसीकरण सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासुन ही संख्या वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. लसीकरणासाठी लोकांना अपॅाईंटमेंटही मिळण्यासाठी वाट पाहावी लागते आहे. पण एकीकडे हा प्रतिसाद वाढत असतानाच उपलब्ध लशींचा साठा संपतोय का काय अशी भीती आरोग्य विभागाचे कर्मचारी व्यक्त करत आहेत.
उपलब्ध आकडेवारीनुसार, पुणे ग्रामीण प्रशासनाकडे साधारण ७,९३६ लशींचा साठा उपलब्ध आहेत. महापालिकेकडे ८,३८० तर पिॅपरी चिंचवड महानगरपालिकेकडे ३,२२९ लस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातच साधारण साधारण दर दिवशी १५ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण होत आहे. त्यातच लसीकरण केंद्राची संख्याही वाढवले जात आहेत. पुणे महापालिकेकडे खासगी रुग्णालये आणि महापालिकेच्या केंद्रावरुन येणारी मागणी देखील वाढलेली आहे. या परिस्थितीमध्ये आत्ताचा साठा जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस पुरेल अशी शक्यता आरोग्य विभागातील कर्मचारी व्यक्त करत आहेत. त्यातच राज्याकडून लस पुरवली जात असली तरी देखील ती मागणी इतकी दिली जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लस संपली किंवा कमी पडली तर काय करायचे असा प्रश्न विचारत मागणी इतकी लस केद्रांना देखील पुरवायला आरोग्य अधिकारी नकार देत आहेत.
याबाबत विचारले असता जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र अशी काही परिस्थती नसल्याचा दावा केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले “ मी याबाबत आढावा घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे साठा संपत येताना नवा साठा पुरवला जात आहे. त्यामुळे अडचण येणार नाही.”--