बारामती: सर्वाधिक कोरोनाबाधित असलेल्या बारामती तालुक्यातील कोरोना लसीकरण मोहीम आज लसीअभावी बंद पडली. मार्गांवर आहे. तर इंदापूर तालुक्यात कोरोना लसीअभावी लसीकरण बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसाठी कोरोना लसीचे डोस कमीप्रमाणात मिळत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम लसीकरणाच्या मोहिमेवर झाला आहे.
बारामतीमध्ये आतापर्यंत 53 हजार नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. सध्या कोरोना महासाथीच्या दुसऱ्या लाटेमुळे जनजीवन अस्वस्थ झाले आहे. बारामतीमध्ये कोरोना संक्रमित दैनंदिन रुग्ण संख्या 300च्या घरात पोहचली आहे. अशा परिस्थितीत कोरोना साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम महत्वाची मानली जाते. मात्र राज्य सरकारकडेच पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम थंडावली आहे. त्याचाच फटका बारामती आणि इंदापूर येथील लसीकरण मोहिमेला बसला आहे. बारामती तालुक्यातील ३३ केंद्रांवर शासनाच्या नियमावलीनुसार खासगी रुग्णालयात को-विन अॅपमध्ये नोंदणी केल्यानंतर लस दिली जाते. सरकारी रुग्णालयात वॉक-इन किंवा ऑन-साइट नोंदणी करून लस देण्यात येते. प्रथम ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक आणि ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस दिली जात असे. तर ४५ ते ५९ वर्षं वयोगटातील कोमॉर्बिड रुग्णांना विना अट लसीकरण करण्यात येत होते. बारामती तालुक्यात दररोज एक हजापेक्षा जास्त नागरिकाचे लसीकरण करण्यात येत होते, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. लसीचा दररोजचा साठा जिल्हाप्रशासनाकडून मिळतो.त्यामुळे तालुका पातळीवर लसींचा साठा करता येत नाही.असेही आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
--------------------
कालपासून लसीचा तुडवडा जाणवत आहे. त्यामुळे इंदापूर, बारामतीतील लसीकरण आज पूर्णपणे बंद आहे. डोस मिळाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू होईल.
- दादासाहेब कांबळे, उपविभागीय अधिकारी, बारामती.
- --------------------------------------------
बारामतीतील रुग्णस्थिती
*एकूण रूग्णसंख्या-11208
* एकूण बरे झालेले रुग्ण- 9008
* मृत्यू-- 176.
* आजचे संक्रमित रुग्ण -255
--------------------------------------------------