पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका लक्षात घेता शासनातर्फे १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना कुटुंब कल्याण माताबाल संगोपन व शालेय आरोग्य विभागातर्फे जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात १५-१८ वयोगटातील ५ लाख ५३ हजार, तर ६० वर्षांवरील २ लाख ६५ हजार सहव्याधी रुग्णांना लस मिळणार आहे. येत्या ३ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. १५ ते १८ वयोगटातील वर्गाला केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर केला जाणार आहे.
१६ जानेवारी २०२१ पासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ९० टक्के लाभार्थींना पहिला डोस देण्यात आला असून ६२ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. राज्यात ८७ टक्के लाभार्थ्यांचा पहिला डोस झाला असून ५७ टक्के लाभार्थ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. कोविड- १९ ग्रुप ऑफ नॅशनल टेक्निकल अँडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन तसेच स्टॅन्डींग टेक्निकल वर्किग सायन्टीफीक कमिटी यांनी कोव्हीड १९ लसीकरण वाढविण्याचे आदेश दिले आहेत. पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर यांनी दोन्ही डोस घेतले असतील तर त्यांना १० जानेवारी २०२२ पासून लसीची दक्षता मात्रा देण्यात येणार आहे. ६० वर्षे किंवा त्यावरील सहव्याधी असलेल्या व्यक्तीना त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांच्या सल्ल्याने १० जानेवारी पासून प्रिकॉशन डोस देण्यात यावा. प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहे.
६० वर्षांवरील व्यक्तीना लस घेताना कोणतेही प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही
सहव्याधी असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तीना प्रिकॉशन डोस देताना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणतेही प्रमाणपत्र जमा करण्याचे किंवा दाखवण्याची आवश्यकता नाही. सर्व नागरीकांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात येईल. ज्या नागरिकांना खाजगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल, अशा नागरिकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेल्या किंमतीमध्ये लसीकरण करता येईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.हेल्थ केअर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ६० वर्षे वा त्यावरील सहव्याधी असलेले नागरीक यांना त्यांच्या सध्याच्या कोविन अकाऊंटवरुन प्रिकॉशन डोससाठी नोंदणी करता येणार आहे. दुस-या डोसनंतर ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झालेल्या लाभार्थीच प्रिकॉशन डोससाठी पात्र ठरतील. जिल्हा तसेच मनपा क्षेत्रामध्ये १५-१८ वर्षे वयोगटातील मुलांचे तसेच हेल्थ केअर वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि ६० वर्षे व त्यावरील वयाच्या सहव्याधी असलेल्या नागरीकांना प्रिकॉशन डोस कार्यवाही करण्यात यावी. दुसरा डोस राहिलेल्या लाभार्थ्यांना लवकरात लवकर दुसरा डोस देऊन पूर्ण करावा, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे.