लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विनामूल्य सरकारी कोरोना लस मिळण्यात अडथळे येत असल्याने अनेकांनी खासगी रुग्णालयांमधून लस मिळवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. मात्र येथेही गर्दी उसळू लागल्याने काही खासगी रुग्णालयांनी कोरोना लसीचा धंदा चालू केल्याचा आरोप पुणेकरांनी केला.
सहाशे रुपयांना मिळणारी कोरोना लस अनेक रुग्णालये नऊशे ते बाराशे रुपये या किमतीत विकत आहेत. ही नफेखोरी लपवण्यासाठी लसीची किंमत सहाशेच दाखवून अन्य खर्चाच्या नावाने अतिरिक्त रक्कम उकळली जात असल्याचे पुणेकरांनी ‘लोकमत’ला सांगितले. इंडियन मेडिकल असोसिएशन याबाबत पुढाकार घेऊन खासगी रुग्णालयांची नफेखोरी थांबवून कोरोना लसीच्या किमतीमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून पुण्यात खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरु झाले. लस उत्पादकांकडून थेट खरेदी करुन खाजगी रुग्णालये लसीकरण करत आहेत. यातली अनेक रुग्णालये कोविशिल्ड लस देत आहेत. ही लस त्यांना सहाशे रुपयांना मिळते. नागरिकांकडून मात्र याच लसीसाठी ९०० ते १२०० रुपये घेतले जात आहेत. कंपन्यांमध्ये लसीकरण करण्यासाठी तर सरसकट एका डोसमागे बाराशे रुपये मागितले जात आहे.
प्रशासनाकडे याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत कोणतेही ‘कार्टेल’ करू नये, अशी सूचना प्रशासनाने रुग्णालयांना दिल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशननेही लसींच्या किमतीबाबत मार्गदर्शक सूचना आखून द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या पुणे विभागाचे संचालक डॉ. संजय पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “रुग्णालयाने साधारण लसीची किंमत तसेच त्याबरोबर लागणारे कर्मचारी आणि तसेच इतर यंत्रणा लक्षात घेऊन किमती निर्धारित कराव्यात. ही सरसकट रक्कम ‘आयएमए’ने ठरवून द्यावी, अशी मागणी आमच्याकडे केली जात आहे. मात्र सर्वच रुग्णालये आयएमएची भूमिका मान्य करतील असे नाही. स्टोरेज तसेच कर्मचाऱ्यांसाठी येणारा खर्च धरता लसीमागे ९०० रुपये आकारणे योग्य आहे. तसेच कॉर्पोरेट लसीकरणासाठी तिकडे टीम नेण्यासाठीचा खर्च गृहीत धरण्यात येतो.”