पुणे : कोविशिल्ड आणि फायझर लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, १० आठवड्यांनी प्रतिपिंडांचे (अँटिबॉडीजचे) प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा अभ्यास अहवाल ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिध्द झाला आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाले, तरी विषाणूबाबतची स्मरणशक्ती ‘टी-सेल्स’ नावाच्या पेशींमध्ये तयार होते. त्यामुळे भविष्यात विषाणूने हल्ला केला, तरी या पेशी नवीन प्रतिपिंडे निर्माण करतात. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या स्वयंसेवकांची संख्या, वयोगट, आहार, रोगप्रतिकारकशक्ती, सहव्याधी हे मुद्देही विचारात घ्यावे लागतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतात कोविशिल्ड लसीचे डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त आहे. त्यामुळे अहवालात नमूद करण्यात आलेल्या निष्कर्षानुसार, लस घेतल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी प्रतिपिंडांचे प्रमाण कमी झाले, तर विषाणूविरोधात मिळणारे संरक्षण कमी होईल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक अभ्यास हवाअॅस्ट्राझेनेका आणि फायझर या दोन्ही नामांकित कंपन्या आहेत. लसीला आपत्कालीन परवानगी देताना कंपन्यांनी बऱ्याच निकषांवर अभ्यास केलेला असतो. कोट्यवधी लोकसंख्येपैकी ६०० ‘सॅम्पल साईज’ ही खूप छोटी संख्या आहे. त्यावरून अंदाज बांधता येऊ शकतो, अंतिम निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. त्यामुळे अहवालाबाबत अधिक अभ्यास गरजेचा आहे.- डॉ. अरविंद देशमुख, अध्यक्ष, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियापेशींची स्मरणशक्ती मरेपर्यंतप्रतिकारशक्तीमध्ये ६ ते ७ प्रकारच्या पेशी तयार होतात. त्यामध्ये काही पेशी अँटिबॉडी तयार करतात, काही स्मरणशक्ती साठवून ठेवतात, तर काही विषाणूवर थेट हल्ला करतात. टी-सेल्समध्ये विषाणूविरोधात स्मरणशक्ती तयार झालेली असते. आपण जिवंत असेपर्यंत या पेशी कार्यरत असतात. त्यामुळे दोन डोस घेतलेल्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.- डॉ. नानासाहेब थोरात, वरिष्ठ शास्त्रज्ञ, ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड