कोरोना लसींच्या दरातील फरक म्हणजे केंद्राची नफेखोरी: नाना पटोलेंचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 01:41 PM2021-04-24T13:41:10+5:302021-04-24T13:41:56+5:30
अनिल देशमुखांवरील कारवाई लक्ष हटवण्यासाठी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची टीका
पुणे: कोरोना लसींच्या दरांमधील फरक हे केंद्र सरकारमध्ये व्यापारी बसले असून त्यांच्या नफेखोरीचे उदाहरण आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अनिल देशमुख यांच्यावर होत असलेली कारवाई म्हणजे मुळ मुद्द्यावरून लक्ष हटवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप त्यांनी केला.
केंद्र सरकारने देशवासियांना कोरोना लस विनामूल्य ऊपलब्ध करून द्यावी अशी पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी करणारे निवेदन पटोले यांनी शनिवारी दुपारी विभागिय आयुक्त सौरभ राव यांना दिले. पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे व अन्य पदाधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
पत्रकारांबरोबर बोलताना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य केले. दोघेही विनामास्क फिरतात, त्यांनी कोणते इंजेक्शन घेतले माहिती नाही अशी खिल्ली उडवत पटोले म्हणाले, मोदींनीच कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे जाहीर केले होते. आता ते राज्यांवर जबाबदारी ढकलत आहे. जगातील अनेक राष्ट्रप्रमुखांंनी नियोजन करून आपल्या देशाला कोरोनामुक्त केले. आपल्या प्रमुखाकडे नियोजन नाही. लसी, ऑक्सिजन, आरोग्य सेवा यापैकी कशाचेही नियोजन त्यांनी केले नाही. राज्य त्यांची जबाबदारी पार पाडत आहेत, मात्र केंद्र सरकार काहीही करायला तयार नाही.
त्यांच्या भाडोत्री कार्यकर्त्यांनी राहूल गांधी, मनमोहन सिंग यांच्या सल्ल्याची टिंगल केली, पण आता त्याप्रमाणेच काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.