पुणे : पुणे शहरातील दिवसेंदिवस झपाट्याने फोफावत असलेला कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिकेने लसीकरणाची मोहिमेचा जोर वाढवला आहे. त्याचाच भाग म्हणून आता महापालिकेने 'मास्टर' प्लॅन आखत आणखी नव्याने २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. त्याला जर परवानगी मिळाल्यास लसीकरण केंद्राची संख्या ३४० इतकी होणार असून दिवसाला तब्बल ७० हजार जणांना लसीकरण करणे शक्य होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली.
१ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सगळ्यांना सरसकट लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून महापालिका प्रशासनाने लसीकरणाची मोहीम आणखी व्यापक करण्याच्या दृष्टीने पावले उचलत आहे. शहरातील अंदाजे २३ टक्के नागरिकांना म्हणजेच १६ लाख नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळू शकणार आहे.
आजमितीला महापालिका आणि खासगी रुग्णालये अशी एकूण १०९ आणि ८ शासकीय अशी एकूण ११७ लसीकरण केंद्र आहे. आता नव्याने आणखी २२३ लसीकरण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव पालिकेकडून केंद्राला पाठविण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास शहरातील लसीकरण केंद्राची संख्या तब्बल ३४० इतकी होईल. येत्या १ एप्रिलपासूनच ही सर्व केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामाध्यमातून दिवसाला जवळपास ७० हजार नागरिकांना लसीकरण करता येऊ शकेल एवढी सोय उपलब्ध होऊ शकेल असेही आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सद्यस्थितीला बारा ते तेरा हजार इतके लसीकरण होत आहे. हा आकडा जवळपास १८ हजारांपर्यंत पोहचला होता. मात्र, लसींचे पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्याने ही संख्या पुन्हा घटली असल्याचे चित्र आहे.
शहरात लसींचा तुटवडा..शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असतानाच पुण्यातील लसीकरणीचा तुटवडा अद्याप काही दुर झालेला नाही. मंगळवार अखेरपर्यंत महापालिकेकडे केवळ ७ हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. तर अनेक केंद्रावरील लस संपल्याने नागरिकांना लस न घेताच मागे फिरावे लागले. मात्र, असे असतानाच पुणे शहराला पुरेशा प्रमाणात अद्यापही लसींचा पुरवठा होत नसल्याची परिस्थिती आहे. महापालिकेकडून त्यासाठी वारंवार केंद्राकडे पाठपुरावा केला आहे.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांनी केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी याबाबत संपर्क करुनही लसींचा अद्याप पुरेसा डोस उपलब्ध होऊ शकलेली नाही. सद्यस्थितीला शहरात दिवसाला सरासरी बारा ते तेरा हजार इतके लसीकरण होत आहे. मात्र, महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत महापालिकेकडे केवळ ७ हजारच डोस शिल्लक होते. त्यामुळे बुधवारी अनेक सेंटरवर लसींचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
--------------------------केंद्राकडून बुधवारी लसींचे डोस येणार आहेत. हे डोस नक्की किती मिळणार आहेत, यासंबधीची माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, बुधवारी लसींचा तुटवडा निर्माण होणार नाही.
- विक्रम कुमार, आयुक्त----------------------------