पुणे: पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यामुळे पुण्यात मागील २महिन्यांपासून चिंतेचे वातावरण आहे. मात्र या परिस्थितीत महापालिका व जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत (दि. २३ ) तब्बल 20 लाखांवर नागरिकांचे लसीकरण यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १७ लाख ६७ हजार ६४५ असून दुसरा डोस पूर्ण केलेल्यांची संख्या २ लाख ४० हजार ८०९ इतकी आहे.
पुण्यातील राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली आहे.पुणे शहरासह जिल्ह्यात देखील चौथ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू वेगाने सुरु आहे. पुणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने लसींच्या पुरवठ्यामध्ये अनेकदा अडथळे आल्यानंतरसुद्धा आजअखेर २० लाखांच्यावर नागरिकांचे यशस्वीपणे लसीकरण पूर्ण केले आहे.
पुणे जिल्ह्यासाठी साधारण दर आठवड्याला सरासरी दीड लाख लसींचे डोस मिळतात.त्यात ग्रामीण भागासाठी ७५ हजार, पुणे शहरासाठी ४० हजार आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी ३५ हजार डोस उपलब्ध करून दिले जातात. पुण्याला दर आठवड्याला किती लसींचे डोस द्यायचे हे राज्याचा आरोग्य विभाग निश्चित करतो.प्रत्येक जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या व लसीकरणाची क्षमता लक्षात घेऊन दर आठवड्याला लसींच्या डोसचे वाटप केले जाते. पुण्यासाठी आठवड्यात मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी लसींचा पुरवठा केला जातो.
शहराची कोरोना प्रतिबंधक लसींची दररोजची गरज ही २० हजार असताना १० हजारच लस उपलब्ध होत आहे. यामुळे अनेक नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. महापालिकेची १०० व खासगी ७२ अशी एकूण १७२ लसीकरण केंद्र पुण्यात सुरू आहे.
शासनाच्या आदेशाप्रमाणे १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाने दवाखाने, शासकीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालये असे मिळून केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. लसीकरणाला वाढणारी गर्दी लक्षात घेता आणखी केंद्र वाढविण्यात येणार आहेत. पालिकेच्या ओपीडीमध्येच लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.