पुणे : पुणे शहरात रविवारी (दि. १६) ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी एकूण १५ केंद्र उपलब्ध असणार आहे. या सर्व केंद्रांवर कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच १७ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना दुसरा डोस दिला जाणार आहे.
शहरातील सर्वच केंद्रांवर उद्या फक्त लस ही दुसऱ्या डोस घेणाऱ्या नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे. पहिला डोस कोणालाही दिला जाणार नाही असेही मोहोळ यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. उद्या देखील नागरिकांना कोविशिल्ड लस उपलब्ध होणार नाही हे यावरून निश्चित झाले आहे.
पुणे शहरात लसीकरणाची मोठी मोहीम राबविली जात आहे. मात्र, लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करताना येणाऱ्या अडचणी, लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे बंद लागलेली लसीकरण केंद्र, बरेच तास रांगेत उभे राहून देखील रिकाम्या हाताने घरी परतावे लागल्यामुळे होणारी चिडचिड असे एक ना अनेक अनुभव लसीकरण मोहिमेत नागरिकांना येत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना देखील केल्या जात आहे.
शहरातील १९४ पैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण
शहरातील एकूण १९४ लसीकरण केंद्रांपैकी दहा केंद्रांवर सर्वाधिक लसीकरण करण्यात आले आहे. आजवर एकूण ९ लाख ३५ हजार ५८२ नागरिकांनी लस घेतली असून यातील १ लाख ८० हजार लसी या दहा केंद्रांवर देण्यात आल्या आहेत. शहरातील सर्वाधिक लसीकरण झालेल्या 'टॉप टेन' केंद्रांमध्ये कोथरूड, येरवडा, शिवाजीनगर, धायरी, बिबवेवाडी, पद्मावती या भागातील रुग्णालयातील केंद्रांचा समावेश आहे. यामध्ये कमला नेहरू केंद्र पहिल्या क्रमांकावर आहे.