पुणे : देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिक तसेच 45 वर्षांपुढील व्याधीग्रस्त नागरिकांना आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर्ससोबत लस देण्याची अनुमती देण्यात आली आहे. लसीकरणाची केंद्रही वाढविण्यात येत आहेत. परंतु, लसीकरणाच्या या घाईगडबडीत ‘विशेष मुले’ (गतीमंद) दुर्लक्षित राहिली आहेत. कोरोनामुळे त्यांच्या काळजीचा ताण वाढला असून त्यांना लस तात्काळ लस देण्याची मागणी पालक आणि स्वयंसेवी संस्थांकडून केली जाऊ लागली आहे.
कोरोना काळात रुग्णसंख्या जसजशी वाढत गेली तसतसे कोविड केअर सेंटर वाढविण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये आजवर दोन लाखांच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. याकाळात गतीमंद मुलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्याची यंत्रणा नव्हती. ती यथावकाश शहरात सुरु करण्यात आली. कोंढव्यातील सिंहगड कॉलेज सेंटरमध्ये या विशेष मुलांवर उपचार करण्यात आले. सुदैवाने सर्व मुले सुरक्षित बरी झाली.
या काळात सर्वाधिक ताण मुलांच्या पालकांवर आणि विशेष मुलांच्या संस्थांवर होता. कोरोनाला दूर ठेवण्याकरिता आवश्यक असलेल्या मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राखणे या नियमांचा जिथे सर्वसामान्य नागरिकांना विसर पडला आहे; तिथे या विशेष मुलांची तर गोष्टच वेगळी. या मुलांना मास्क वापरण्याचे, वारंवार हात धुण्याचे, सॅनिटायझर वापरण्याचे किंवा सुरक्षित अंतर राखण्याचे भान राहात नाही. ही मुले स्वच्छंदीपणाने वागत असतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याची भीती अधिक आहे.
पालकांना सतत मुलांच्या मागे जावे लागते. त्यांच्यावर लक्ष ठेवावे लागते. त्यातच या मुलांसाठी काम करणा-या विविध संस्थांनांही अधिक खबरदारी बाळगावी लागत आहे. त्यामुळे काही संस्थांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, केंद्रिय मंत्र्यांकडे पत्र देऊन या मुलांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. ====माझा मुलगा गतीमंद आहे. त्याला स्वत:चे काहीही करता येत नाही. कोरोनाकाळात त्याची सतत काळजी लागून राहते. ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्तांना लस दिली जात आहे. मग, या मुलांना लस का उपलब्ध करुन दिली जात नाही. त्यांच्या वागण्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यामुळे त्यांना लसीची अधिक आवश्यकता आहे. शासनाने याचा विचार करुन विशेष मुलांसाठी तात्काळ लस उपलब्ध करुन द्यावी. - एकनाथ ढोले, पालक====विशेष मुलांच्या संस्थांमध्ये शेकडो मुले राहत आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि काळजी घेणे पुर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक झाले आहे. या मुलांना मास्क वापरणे, सतत हात धुणे, सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतराबाबत भान नसते. त्यांना त्याबाबत आग्रह केला तर चिडचिड होते. त्यांना प्राथमिकता देऊन लस उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी आम्ही केंद्रिय मंत्री, जिल्हा परिषद, वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांकडे केली आहे. यासोबतच त्यांचे पालक आणि काळजीवाहक यांनाही फ्रंटलाईन वर्कर म्हणून लस दिली जावी अशी आमची मागणी आहे. - निलीमा देसाई, नवक्षितीज संस्था