पुणे: लसीकरण न झालेल्या १८ वर्षांवरील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी पुणे महापालिकेमार्फत थेट महाविद्यालय परिसरातच लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यासाठी लवकरच महापालिका विशेष मोहीम राबवणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (murlidhar mohol) यांनी दिली आहे. पुण्यातील महाविद्यालये सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लसीकरणाचे दोन्ही डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयासाठी परवानगी असणार आहे, ही माहिती काल पालकमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिली होती.
हॉटेल, रेस्टॉरंट, बार रात्री ११ पर्यंत राहणार सुरू-पुणे मनपा हद्दीतील सर्व प्रकारची हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार आदी आस्थापनांना रात्री ११ पर्यंत डाईन सुविधा सुरु ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हॉटेल्सलाही रात्री ११ पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. याशिवाय कोरोना संसर्ग सद्यस्थिती, महापालिकेच्या उपाययोजना आणि लसीकरण यासंदर्भातील माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पालकमंत्री अजित पवारांना बैठकीत दिली. पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक काल संपन्न झाली.