परिंचे : जगात थैमान घातलेल्या कोरना या महामारिच्या विरोधात सर्व जणच सरसावले आहेत. या महामारीला रोखण्यासाठी व त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी प्रत्येक जण विविध उपाययोजना करीत आहे. परिंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी विविध उपाययोजना राबवून एक परिंचे पॅटर्न निर्माण केला आहे.
या मुळे कोरोनाच्या महामारीत ग्रामस्थांना मोठा आधार मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या स्तरावर चाळीस लोकांची एक कोरोना दक्षता समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीत विविध राजकीय पक्ष, संघटना, महिला बचतगट, आशा कर्मचारी. अंगणवाडी सेविका, तरुण मंडळे यांच्या प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला आहे. या समितीद्वारे जनसंपर्क, जनजागृती व कोरोना बाधितांना आधार व मदत करण्यात येत आहे. वाडीवस्तीवरील पंच्येचाळीस वर्षांवरील नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करणे व त्यांच्या जाण्या येण्याची व्यावस्था करणे. घरोघरी जाऊन लसीकरणाचा आढावा घेणे.
प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे यांचे सहकार्याने ग्रामपंचायतीमार्फत गावातील प्रत्येक नागरिकांची आँक्सिजन पातळी तपासणे ज्याना गरज आहे. अशा नागरिकांना तातडीने आरोग्य सेवा पुरविणे. जे होम क्वाॅरंटाईन आहेत त्यांना मानसिक आधार देणे व त्यांच्या परिसरात निर्जंतुकीकरण करणे संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. सरपंच जाधव यांनी आपला वैयक्तिक नंबर नागरिकांना दिला असून रात्रंदिवस चोवीस तास उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. कोविड स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हावे असे अवाहन गावातील युवक-युवतींना करण्यात आले असून अनेक जण सहभागी होत आहेत. वेळोवेळी येणाऱ्या कोरोना संबंधातील शासनाच्या विविध आदेशांचे पालन काटेकोर पणे करण्यात येत आहे.