पुणे : पुणे महापालिका क्षेत्रात बुधवारी १५२ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली असून, ११३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज विविध रूग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या चौदा कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत २ हजार २३ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. सद्यस्थितीला अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या (विविध रूग्णालयात उपचार घेत असलेले रूग्ण) १ हजार ६५६ इतकी आहे. तर आत्तापर्यंत २२१ जणांचा मृत्यू झाला असून, एकाच दिवसात शहरात प्रथमच सर्वाधिक म्हणजे १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रूग्णांपैकी ८ जण हे ससून रूग्णालयातील असून, उर्वरित रूग्ण हे ६ जण हे खाजगी रूग्णालयातील आहेत. बुधवारी एकूण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी १६५ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, यापैकी ४३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. आज नव्याने दाखल झालेल्या १५२ रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १९, नायडू व पालिकेच्या अन्य रूग्णालयामध्ये ८६ जण तर खाजगी रूग्णालयात ४७ जण उपचार घेत आहेत. तर आज १ हजार ५०७ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.