पुणे : शहरात कोविड-१९ह्ण च्या तपासणीचे प्रमाण वाढविल्यापासून अधिकाधिक कोरोना पॉझिटिव्ह (कोव्हिड-१९) रूग्णांची संख्या समोर येत असली तरी, दुसरीकडे शहरातील कोरोनाबाधितांचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. गुरूवारी शहरात २०८ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असले तरी, आज तब्बल १५९ कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात सर्वाधिक म्हणजेच १ हजार ७३३ कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर प्रयोगशाळेकडून आलेल्या अहवालांमध्ये २०८ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत़ यापैकी महापालिकेच्या नायडू व आयसोलेशन सेंटरमध्ये १४८, ससून हॉस्पिटलमध्ये १३ व खाजगी हॉस्पिटलमध्ये १६९ जणांना पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये १ हजार ६९८ कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत असून, यापैकी १६९ रूग्णांची प्रकृती गंभीर आहे तर ४४ जण व्हेंटिलेटरवर आहेत. गुरूवारी सात कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून, यापैकी दोन जण ससून हॉस्पिटलमधील तर उर्वरित पाच जण हे खाजगी रूग्णालयात उपचार घेत होते. पुणे शहरात ९ मार्च पासून आजपर्यंत एकूण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ हजार १०७ इतकी झाली आहे़ यापैकी ४१२ जण ससून हॉस्पिटलमध्ये तर उर्वरित ३ हजार ६९५ रूग्ण हे पालिकेच्या नायडू हॉस्पिटल, आयसोलेशन सेंटर व शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. यापैकी २ हजार १८२ रूग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर २२७ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी बहुतांशी जण हे अन्य आजाराने पहिल्या पासूनच गंभीर होते.कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागल्यापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून महापालिका हद्दीतील प्रत्येक घरात जाऊन सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले. या सर्वेक्षणाची सध्या पाचवी फेरी सुरू असून, यामध्ये कोणाला कोरोना आजारासंबंधी लक्षणे आहेत का याची तपासणी केली जात आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ३३ लाख ८७ हजार ९८५ घरी जाऊन १ कोटी १४ लाख ६० हजार ४५१ व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाकरिता महापालिकेच्या ७१२ टिमकडून काम सुरू असून, त्यांनी केलेल्या तपासणीत ४ हजार २१ व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळून आल्याने क्वारंटाईन करण्यात आले़ तर २ हजार ४७२ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले. आजमितीला १ हजार ६३ कोरोनाबाधित रूग्ण पालिकेच्या नायडू हॉस्पिटलसह अन्य आयसोलेशन सेंटरमध्ये, १५३ जण ससून हॉस्पिटलमध्ये तर ४८२ रूग्ण हे शहरातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.