पुणे : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रशासनाने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर दिला. शहरात दर दहा लाख लोकांमागे ३० हजार तपासण्या केल्या जात असून हे प्रमाण राज्य आणि देशात सर्वाधिक आहे. राज्यात पुण्याखालोखाल मुंबईचा क्रमांक लागतो.
शहरातील कोरोना बधितांचा आकडा २४ हजारांच्या पुढे गेला आहे. तर, आजमितीस साडेआठ हजार ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सुरुवातीच्या काळात अगदी २०० ते ३०० च्या प्रमाणात होत असलेल्या चाचण्या नंतर हजारांच्या पटीत वाढविण्यात आल्या. सद्यःस्थितीत दिवसाला साधारणपणे तीन ते साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णसंख्याही वाढल्याचे दिसत आहे. निष्पन्न होणाऱ्या रुग्णांना तातडीने उपचारांची व्यवस्थाही केली जात आहे.
शहरात वाढलेले तपासण्यांचे प्रमाण पाहता रुग्णसंख्या वाढणार हे निश्चित आहे. नुकतेच पालिकेने 'रॅपिड अँटिजेन टेस्ट' किटद्वारे तपासणीला सुरुवात केली आहे. ५ जुलैच्या आकडेवारीनुसार पुण्यात दर दहा लाख लोकांमागे २९ हजार ९८८ तपासण्या केल्या जात आहेत. हे प्रमाण मुंबई, महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत अधिक आहे. मुंबईमध्ये दर दहा लाखांमागे २४ हजार १२३ असे प्रमाण आहे. तर, राज्यात हेच प्रमाण दर दहा लाखांमागे ७ हजार ३७६ आणि देश पातळीवर ५ हजार ९७२ असे आहे. चाचण्यांमुळे रुग्ण लवकर निष्पन्न होण्यास आणि त्यांच्यापासून होणारा संभाव्य प्रसार रोखण्यास मदत मिळत आहे. त्यामुळे प्रशासन अधिकाधिक तपासण्यांवर भर देत आहे. -------- पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत २ लाख ३३ हजार २५४ नागरिकांचे ट्रेसिंग करण्यात आले असून यामध्ये ७३ हजार ३८३ नागरिक 'हाय रिस्क' गटातील आहेत. तर, १ लाख ५९ हजार ८७१ नागरिक 'लो रिस्क' गटातील आहेत. --------- गेल्या चार आठवड्यात वाढलेले स्वाब टेस्टचे प्रमाण आठवडा स्वाब टेस्ट ८-१४ जून- १२, ७३५ १५-२१ जून १५, ७५४ २२-२८ जून २०, ८२४ २९ जून -०५ जुलै २४, ८१३ ---------