पुणे : शहरातील स्वॅब तपासणीचे प्रमाण वाढल्यापासून दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्ण वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या नव्या रूग्णांमध्ये आता शहरातील कंटन्मेंट झोनबरोबरच झोन बाहेरील रूग्ण वाढही लक्षणीय असून, शुक्रवारी नव्याने ३०५ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सद्यस्थितीला शहरातील विविध हॉस्पिटलमध्ये २२२ रूग्ण गंभीर असून, ४९ रूग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ३९५ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, यापैकी २२५ जण पालिकेच्या नायडू हॉस्पिटल व आयसोलेशन सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. तर ससूनमध्ये १५ व खाजगी हॉस्पिटलमध्ये ६५ रूग्ण दाखल आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या १४२ जणांपैकी १०३ जण हे विविध आयासोलेशन सेंटरमधील असून, खाजगी हॉस्पिटलमधील २६ जण तर ससून हॉस्पिटलमधील १३ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ आजपर्यंत शहरात एकूण कोरोनाबाधितांपैकी ५ हजार ९२४ कोरोनामुक्त झाले असून, ही टक्केवारी ६५.४२ टक्के इतकी आहे. पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आज मृत्यू झालेल्या १२ जणांचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांमध्ये ४ जण हे ससून हॉस्पिटलमधील असून, नवले हॉस्पिटलमधील ४ जणांसह आठ जण हे खाजगी हॉस्पिटलमधील आहेत. आज दिवसभरात शहरातील २ हजार २४९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, आत्तापर्यंत पुणे महापालिका हद्दतील ६८ हजार ७३६ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.
Corona virus : पुणे शहरात शुक्रवारी ३०५ नवीन बाधित : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 9:48 PM
पुणे शहरात ९ मार्चपासून आजपर्यंत ९ हजार ८२ कोरोनाबाधित
ठळक मुद्देआज १४२ जण कोरोनामुक्त : कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६५़. ४२ टक्के