कळस: इंदापुर तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज अंथुर्णे येथील डॉ मधुकर रामचंद्र धापटे यांचा कोरोनावर उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत तालुक्यात ३५३ जणांचा बळी गेला आहे.
एप्रिल महिन्यात डॉ. धापटे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना बारामतीत खासगी दवाखान्यात दाखल केल्यावर उपचाराचा काही फरक पडत नसल्याने पुण्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. काही दिवस तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र एक महिन्यानंतरही तब्बेतीत सुधारणा दिसून आली नाही. अखेर शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. ते ४५ वर्षांचे होते. तालुक्यातील अंथुर्णे येथे असणाऱ्या रुग्णालयात ते कार्यरत होते. त्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे
तालुक्यात लाँकडाऊन मुळे गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या कमी दिलासा मिळत आहे. परंतु रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना जीव गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे.
शनिवारी आढळून आले ८४ जण कोरोना रुग्ण
शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागातही कोरोन बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य, महसूल व सर्वच प्रशासन कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी मेहनत घेत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र नगरपालिका प्रशासन लसीकरण व आरोग्य तपासणीबाबत नागरिकांना जागृत करत आहेत. इंदापूर तालुक्यात आज अखेर ग्रामीण भागात १३ हजार २६२, तर शहरी भागात २ हजार २२२ कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ३५३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर १३ हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.