पुणे : शहरातील कोरोना बधितांची संख्या झपाट्याने वाढत असून समाजातील कोणताही वर्ग त्यापासून दूर राहिलेला नाही. अहोरात्र रस्त्यावर असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण सुरू झाली आहे. त्यापाठोपाठ आता कोरोनाच्या रुग्णांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. पालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाला अटकाव करण्याकरिता पालिका सर्व प्रकारच्या उपाययोजना करीत आहे. या लढाईमध्ये पालिका प्रशासन पूर्णपणे व्यस्त असतानाही दैनंदिन स्वच्छता आणि आरोग्यविषयक कामे चोख पार पडली जात आहेत. ही कामे करणाऱ्या येरवड्यातील सहायक आरोग्य निरीक्षकासह गुलटेकडीतील एक मुकादम, भवानी पेठ व धनकवडीतील दोन सफाई कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भवानी पेठ आणि धनकवडीतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. तसेच स्वच्छच्या दोन कचरावाचकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४३ जणांची पालिकेने तपासणी करून घेतली आहे. त्यांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी आहे. पुणेकरांचे आरोग्य व्यवस्थित राहावे याकरिता दिवसरात्र काम करणाऱ्या यंत्रणेतील कर्मचारी कोरोनाबधित झाल्याने अधिक काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
Corona virus : पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचा प्रादुर्भाव; सहा कर्मचारी बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 3:46 PM
महापालिकेच्या सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
ठळक मुद्देयेरवडा, गुलटेकडी, भवानी पेठ व धनकवडीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण