पुणे : योग्य उपचार.. काळजीपूर्वक केली जाणारी देखभाल आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ९१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने कोरोनावर मात केली आहे. तब्बल २५ दिवसांपासून जम्बो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या ज्येष्ठाला बुधवारी घरी सोडण्यात आले.
नारायण रामचंद्र शेलार (वय ९१) असे या करोना योद्ध्याचे नाव आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. खोकला व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने दम लागत होता. त्यांना जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या सर्व कुटुंबीयांसह जम्बो सेंटरमधील करोना योद्ध्यांनीही आनंद व्यक्त केला. शेलार यांनी जम्बोमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचा-यांचे आभार मानले.
या रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा उत्तम असून नाश्ता, जेवण, औषधे वेळेवर देण्यात येत होते. डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी व विचारपूस करण्यात येत होती. तसेच, कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधता येत होता, असे सांगत शेलार यांनी सेवेबद्दल समाधान व्यक्त केले.यापूर्वी यवत येथील संगीता पांढरे या गंभीर अवस्थेतील ५५ वर्षीय महिलेने तब्बल ३१ दिवस लढा देत कोरोनावर विजय मिळवला होता. आठ दिवस व्हेंटिलेटरवर असूनही इच्छाशक्ती आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या जोरावर त्यांनी करोनावर मात केली.
सर्व प्रकारच्या रुग्णांची सर्वतोपरी आणि आपुलकीने काळजी घेतली जात आहे. येथील प्रत्येक रुग्ण बरा व्हावा याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. रुग्ण बरे होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत असल्याचे जम्बो कोविड सेंटरच्या कार्यकारी अध्यक्ष व अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सांगितले.