पुणे : लॉकडाऊनमधील शिथिलता व नंतर पुकारण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनव्दारे अधिकाधिक कोरोनाबाधितांपर्यंत पोहचण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नामुळे जुलै महिन्यात मार्चपासूनच्या काळात सर्वाधिक रूग्ण आढळून आले आहेत. पण त्याचवेळी आत्तापर्यंत सर्वाधिक रूग्ण हे याच महिन्यात कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.
जुलै महिन्यात शहरात ३७ हजार २७ बाधित रूग्ण आढळून आले असले तरी, या महिन्यात २४ हजार ६८४ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून एकापाठोपाठ एक लॉकडाऊन जाहिर करण्यात आले.मात्र, जुन महिन्यात या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. परिणामी जुलै महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात रूग्णवाढीची संख्या लक्षणीय झाली. यामुळे पुन्हा १४ जुलैपासून दहा दिवसांसाठी कडकडीत लॉकडाऊन पुकारण्यात आला. या काळात सर्वाधिक रूग्णवाढ शहरात पाहण्यास मिळाली. परंतु, सौम्य लक्षणे असलेल्या व ज्या रूग्णांना त्यांच्या घरात सर्व स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध होऊ शकते अशा हजारो रूग्णांना घरी सोडण्यात आले. यामुळे ३१ जुलै अखेर शहरातील अॅक्टिव रूग्ण संख्या ही ३५ टक्क्यांवर आली असून हा आकडा १७ हजार ८२० इतका आहे.
जुलै महिन्यात १८ जुलैपासून कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची टक्केवारी दररोज १ टक्क्याने वाढत गेली. १८ जुलैला ३६ टक्के असलेली ही वाढ २५ जुलैला ३९ टक्क्यांवर पोेहचली.परंतु, यानंतर ३० जुलैपर्यंत ही वाढ घसरली आणि पुन्हा ३५ टक्क्यांवर आली.
शहरातील रूग्णवाढ ही विशिष्ट भागापुरती मर्यादित न राहता ती शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचली असताना, या जुलै महिन्यात प्रारंभीच्या तीन महिन्यात सर्वाधिक रूग्णवाढ असलेल्या भवानीपेठ ने यावर यशस्वी मात केली. या महिन्याच्या अखेरीस या क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत केवळ २ हजार ८९३ पैकी केवळ ३९२ अॅक्टिव रूग्ण आहेत. तर याचतुलनेत प्रारंभीच्या काळात ग्रीन झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय हद्दीत १ हजार ७५३ रूग्णांपैकी ३८२ अॅक्टिव रूग्ण आहेत.
---------------------------
प्रतिबंधित क्षेत्रांना कोणी जुमानेना
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर पुणे महापालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करीत बाधित भागच सील करण्यासाठी पत्रे बांबू लावून कार्यवाही केली. परंतु, आजमितीला १ आॅगस्टपासून शहरात ७५ प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) असले तरी, या परिसरातील नागरिक प्रशासनाने लादून दिलेले नियम सर्रास पायदळी तुडवत आहेत. प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेवर लावलेले पत्रे अथवा बांबू स्थानिकांकडून हटविले जात असून, या भागातील नागरिकांची ये-जा इतर भागात वारंवार सुरू आहे. तर काही प्रतिबंधित क्षेत्रांच्या सीमांवर पत्रे बांबू न लावता हा भाग प्रतिबंधित केला आहे असे पोस्टर्स प्रशासनाने लावले आहे़ परंतु याची कोणीही तमा बाळगता दिसत नाही.
------------------------------