पुणे : जिल्ह्यात अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली असून इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या आजाराला पराभूत केले आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले असून, पूर्णपणे बऱ्या झालेल्या या महिलेला बुधवारी घरी सोडण्यात येणार आहे. या महिलेचे वय आणि मूळ प्रकृती धडधाकट असणे यामुळे ती व्हेंटिलेटरवर (कृत्रिम श्वासोच्छवास यंत्रणा) असूनही ठणठणीत बरी झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.ही महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यानंतर ग्रामीण भागात काळजीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, एका हॉस्पिटलमध्ये या महिलेला दाखल करण्यात आले होते. या महिलेवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू केले होते. महापालिकेचा आरोग्य विभागही या रुग्णावर लक्ष ठेवून होता. चौदा दिवसांनंतर केल्या जाणाऱ्या तपासणीचे अहवाल सोमवारी निगेटिव्ह आले. त्यांची दुसरी तपासणी मंगळवारी करण्यात आली असून, त्याचे अहवाल येणे बाकी आहे.दरम्यान, संबंधित हॉस्पिटलचे अधिष्ठाता आणि त्यांच्या टीमला पालिका आयुक्तांनी बोलावून घेत उपचारांची आणि उपाययोजनांची माहिती घेतली. या महिलेची दुसरी चाचणीही निगेटिव्ह येईल, अशी आशा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे.
...................................
रूग्णाला पोटावर झोपवून केले व्हेंटिलेशनकोरोनाबाधित महिलेला व्हेंटिलेटरवरून मंगळवारी सकाळी काढले आहे. जवळपास दहा दिवसांनंतर ती आयसीयूमधून बाहेर आली आहे. ती कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शासनाच्या नियमावलीप्रमाणे उपचार देण्यास सुरुवात केली. महिलेला न्युमोनिया झाला होता. ही पहिलीच केस असल्याने थोडी भीती होती. पण आम्ही हे आव्हान स्वीकारले. न्युमोनियामुळे तिला पोटावर झोपवून व्हेंटिलेशन केले. सहसा रुग्णाला व्हेंटिलेशन करताना पाठीवर झोपविले जाते. महिलेला सहा तास सरळ, सहा तास पोटावर असे झोपविले जात होते. मग हळूहळू ती यातून बाहेर येत गेली. त्यामुळे दोन दिवसांपासून औषधे कमी करण्यास सुरुवात केली. सोमवारी ती हळूहळू बोलू लागली. आता ती कोरोनामधून बाहेर आली आहे. पण दहा दिवस व्हेंटिलेटरवर असल्याने शरीर कमजोर झाले आहे. त्यामुळे आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार आहे.- डॉ. संजय ललवाणी, वैद्यकीय तज्ज्ञ
...............
पुण्यात नव्याने दोन रुग्ण; पिंपरीतील १0 झाले बरेपुण्यात मंगळवारी नव्याने दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४८ झाली आहे. हे दोन्ही रुग्ण पुणे शहरातील आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच अनेक कडक निर्बंध देखील घातले आहेत. परंतु पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये वाढ सुरूच आहे . पुण्यात आतापर्यंत १ हजार २३५ कोरोना संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडमधील एका रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्याची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे आता १२ रूग्णांपैकी १0 रूग्ण बरे झाले आहेत.