पुणे : उपचारांसाठी शहरात आठ तास बेड उपलब्ध होत नसल्याने आंदोलन कराव्या लागलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा अखेर मृत्यू झाला. बुधवारी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाच्या दाव्यांचा फुगा या घटनेमुळे फुटला आहे.
धायरी परिसरात राहणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. सौम्य लक्षणे असल्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घरीच औषधोपचार घेत होता. मंगळवारी दुपारी त्याला श्वासनाचा त्रास झाला. त्याच्या कुटुंबियाांनी ऑक्सिजन सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेची व्यवस्था करून रुग्णालय शोधायला सुरुवात केली. दुपारी दोन वाजता सिंहगड रस्त्यावर सुरू झालेला त्यांचा प्रयत्न सर्व बड्या रुग्णालयातून फिरून संपला. रात्री आठपर्यंत त्यांना कुठेही बेड मिळाला नाही. संतापलेल्या नातेबाईकांनी रुग्णवाहिका घेऊन थेट टिळक चौकातील छत्रपती संभाजी महाराज पोलीस चौकीच्या समोरच रस्त्यावर ठाण मांडले.
रुग्णवाहिकेमधील ऑक्सिजनही केवळ २० टक्केच शिल्लक होता. पोलिसांनी स्वयंसेवी संस्था, पत्रकार, महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला. रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडी येथे एका खासगी रूग्णालयात बेड मिळाल्यावर तेथे उओचार सुरू करण्यात आले. बुधवारी दुपारी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेचा तकलादूपणा पुन्हा एकदा समोर आला असून सर्वसामान्यांना बडी रुग्णालये दाद देत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.