पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढीचे सत्र अद्यापही शंभराच्या आसपासच असून, रविवारी एका दिवसात शहरात ९९ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे पुणे शहरातील (पुणे महापालिका हद्दीत) कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार ८१७ एवढी झाली आहे. तर आज ५५ कोरोनाबाधित रूग्णांना उपचाराअंती पूर्णत: बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आज शहरातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी सात जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री नऊपर्यंत शहरात ९९ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून, यापैकी ७५ रूग्ण हे नायडू व पालिकेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे तर, १४ कोरोनाबाधितांवर खाजगी रूग्णालयात उपचार चालू आहेत. तसेच १० जणांना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या शहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी ५८ जणांची प्रकृती गंभीर असून, यापैकी १७ जण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आज कोरोनामुक्त होऊन घरी परतलेल्या ५५ जणांपैकी सिम्बॉयसिस येथील ३३, ससूनमधील ३, नायडू हॉस्पिटलमधील १० भारती हॉस्पिटलमधील ७ व केईम हॉस्पिटलमधील २ रूग्णांचा समावेश आहे़ आजपर्यंत पुणे शहरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ही ४३३ झाली आहे. आज मृत्यू पावलेले सात रूग्णांपैकी ५ जण ससून तर २ जण हे भारती हॉस्पिटलमधील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनाबाधित रूग्णांच्या मृतांची संख्या १०१ झाली आहे.
Corona virus : पुणे शहरात रविवारी आणखी ९९ रूग्णांची वाढ : ७ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2020 1:07 PM
कोरोनाबाधित रूग्णसंख्या १ हजार ८१७ एवढी झाली आहे.
ठळक मुद्देशहरातील विविध रूग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रूग्णांपैकी ५८ जणांची प्रकृती गंभीर