उरुळी कांचन : सर्दी व खोकल्याने हैराण असतानाही, पुण्यातील भवानी पेठ परिसरातुन उरुळी कांचन येथील नातेवाईकाच्या घरी तीन दिवसापुर्वी हवापालट करण्यासाठी आलेल्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा पुण्यातील नायडु रुग्णालयात उपचार चालु असतांना शनिवारी (ता. ९) सकाळी मृत्यू झाला. मृत्युनंतर संबधित व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळुन आल्याने उरुळी कांचनवर पुन्हा कोरोना संकटाची टांगती तलवार फिरु लागली आहे.
उरुळी कांचन परिसरातील हा तिसरा तर पुर्व हवेलीमधील दहावा रुग्ण आहे. दरम्यान उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ. सुचिता कदम यांनीही, पुण्याहुन उरुळी कांचन येथील नातेवाईकाकडे आलेली पन्नास वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. सर्दी व खोकल्याने हैराण असतानाही पुण्यातून भवानी पेठेतील एक व्यक्ती उरुळी कांचन येथील नातेवाईकांकडे शुक्रवारी (ता. ८) रात्री दहाच्या सुमारास आली होती. पुण्याहुन आलेली व्यक्ती घराच्या बाहेर खोकत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच, काही जणांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवली. ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ हालचाली करुन, संबधित व्यक्तीला पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविले. मात्र उपचारादरम्यान व्यक्तीचा शनिवारी दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला. मृत्युनंतर संबधित व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची बाब रुग्णालयाच्या लक्षात आली.
डॉ. सुचिता कदम म्हणाल्या, कोरोना बाधित व्यक्ती उरुळी कांचन येथील नातेवाईकांच्या घरी तीन ते चार तासाहुन अधिक काळ वावरली असल्याने नातेवाईक व त्यांच्या घरातील सतरा जणांच्या घशातील द्रव घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. उरुळी कांचन येथील नातेवाईक राहत असलेल्या वस्तीचे रविवारी रात्री पासुनच निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या रुग्णाचे उरुळी कांचन येथील नातेवाईक व त्याच्या संपर्कातील अन्य काही अशा सतरा जणांचा तपासणी अहवाल आल्यानंतरच पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. ............................उरुळी कांचन येथे कटेंन्मेंट झोन ची मुदत वाढणार...उरुळी कांचन येथे चोवीस दिवसापुर्वी एक सत्तेचाळीस वर्षीय महिला व तिच्यावर कदमवाकवस्ती येथील खाजगी रुग्णालयात उपचार करणारे उरुळी कांचन येथील एक डॉक्टर वीस दिवसांपूर्वी असे दोघेजण कोरोना बाधीत असल्याचे आढळुन आले होते. यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन मागील वीस दिवसापासुन उरुळी कांचन व परीसर प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर केले आहे. सत्तेचाळीस वर्षीय कोरोना बाधीत महिला व डॉक्टर हे दोघेही उपचार घेऊन घरी परतल्याने महसुल प्रशासन मंगळवार (ता. १२) पासुन उरुळी कांचनचे प्रतिबंधीत क्षेत्र हटविण्याच्या मार्गावर होते. मात्र वरील रुग्ण सापडल्याने, कटेंन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) ची मुदत मंगळवारी वाढणार की संपणार हे उरुळी कांचन येथील या रुग्णाचे नातेवाईक व त्यांच्या घरातील सतरा जणांचा कोरोना तपासणी अहवाल काय येतो यावर ठरणार आहे................................या भागात पुणे परिसरातून काही नागरिक आपल्या कुटुंबियांसह गुपचूपरित्या रात्री अपरात्री येतात व येथे खोल्या भाड्याने घेऊन राहण्याचा प्रयत्न करतात असे स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे, त्यामुळे प्रशासनाने अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे............तसेच घर मालकांनाही ग्रामपंचायतीच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की कोणीही सध्याच्या परिस्थितीत नव्याने भाडेकरूंना जागा उपलब्ध करून देऊ नये.