पुणे : शहरातील कंटन्मेंट झोनची एकत्रित पुर्नरचना न करता आता, क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या पाहणीनुसार, कोरोना प्रादुर्भाव असलेला काही भाग लागलीच 'कंटन्मेंट झोन' (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हे पाऊल उचलले असून, तर यापुढे दर शुक्रवारी कोरोना रूग्णांचा आढावा घेऊन, संपूर्ण शहरातील कंटन्मेंट झोन पुनर्रचना जाहिर करण्यात येणार आहेत.
पुणे शहरात लॉकडाऊनचा कालवधी वाढत जात असताना, काही भागात शिथिलता देऊन चार वेळा कंटन्मेंट झोन नव्याने तयार करण्यात आले. यात ३ मे, १८ मे, १ जून व १७ जून रोजी ४ वेळा कंटन्मेंट झोनची रचना करून तो भाग सील केला गेला. संबंधित भाग सील केल्याने येथील कोरोनाचा प्रसार रोखण्यास प्रशासनास यशही आले. या पार्श्वभूमीवर आता संपूर्ण शहरातील कंटन्मेंट झोनची पुर्नरचनेची वाट न पाहता, क्षेत्रिय कार्यालय स्तरावर ज्या भागात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण जास्त आढळून आले आहेत, तो भाग कंटन्मेंट झोन जाहिर करून सील करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांच्या परवानगीने क्षेत्रिय अधिकारी आपल्या परिसरात यापुढे कंटन्मेंट झोन जाहिर करू शकणार आहेत. दरम्यान शहरातील कोरोनाचा प्रसार ज्या भागात होत आहे तो भाग नव्याने समाविष्ट करून, ज्या कंटन्मेंट झोनमधील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. त्याची पुनर्रचना दर शुक्रवारी करण्यात येणार आहे.
--------------------------
बी. टी.क़वडे रस्ता व परिसरात कंटन्मेंट झोन
ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयांतर्गत येणाऱ्या बी.टी. कवडे रस्ता व परिसरात काही भाग शहरातील ७४ वा कंटन्मेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहिर करण्यात आला आहे. या भागात ४३ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने, भारत फोर्ज, कल्याणी स्टील कंपनी, शिर्के कंपनी आणि शिंदे वस्ती, पुणे छावणी क्षेत्राची घोरपडीकडील हद्द, मिरज रेल्वेलाईन परिसर, सोलापूर रेल्वे ट्रॅक यामध्ये श्रीनाथनगर, बी़टीक़वडे रोड, पवार इंटरप्रायजेस, शक्तीनगर, पंचशील नगर, घोपरडी गाव, फैलवाडी चाळ, भीमनगर हा भाग ३० जूनपर्यंत सील करण्यात आला आहे़
ढोले पाटील क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी दयानंद सोनकांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरात काही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या १९४ जणांचे स्वॅब घेण्यात आले. या तपासणीत ४३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.नागरिकांकडून सोशल डिस्टसिंगचे पालन न होणे, दाट लोकवस्ती यामुळे हा परिसर ३० जूनपर्यंत महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सील करण्यात आला आहे.
----------------------------------