Corona Virus Baramati : बारामतीत कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू देऊ नका : अजित पवारांच्या प्रशासनाला सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 05:04 PM2021-05-08T17:04:15+5:302021-05-08T17:09:39+5:30
विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करा : अजित पवार
बारामती: बारामती तालुक्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी.कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु देऊ नका यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी अशी सूचना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोविड -१९ विषाणू प्रादुर्भाव परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक शनिवारी(दि ८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सभापती निता फरांदे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निबंर्धांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करा. कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्याची सूचनाही पवार यांनी केल्या.